रत्नागिरी : नियती कशी झडप घालेल याचा नेम नाही़ अपघातग्रस्त मुलीचा मृतदेह घरी नेत असताना आईवडिलांच्या वाहनावर काळाने झडप घातली आणि अवघ्या पाच तासांत अवघं कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले़ संगमेश्वर व पानवलमधील या गुरुवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चारजण ठार झाले. पहाटे झालेल्या रिक्षा अपघातात युवतीचा मृत्यू झाला आणि काही तासांनी तिचा मृतदेह घरी नेण्याआधी तिच्या माता-पितांच्या कारवर जेसीबी पडला आणि मुलीपाठोपाठ त्या दोघांची प्राणज्योतही मालवली. धनश्री प्रवीण कदम (वय १७), प्रवीण रामचंद्र कदम (४०, खेड), प्रियांका प्रवीण कदम (३८, खेड), कारमालक नरेश गणपत देवरुखकर (५०, खेड) अशी मृतांची नावे आहेत. आज (गुरुवार) सकाळी प्रवीण कदम व त्यांची पत्नी प्रियांका हे मुलगी धनश्री हिच्यासह पहाटे साडेचार वाजता रिक्षाने खेडहून रत्नागिरीत येत होते. सकाळी ६.४५ वाजता संगमेश्वर येथे रिक्षाला अपघात झाला. रिक्षाखाली सापडून धनश्री जागीच ठार झाली. तिला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून रत्नागिरीत जिल्हा रुग्णालयात हलविले गेले. तेथे ती मृत असल्याचे घोषित झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. तिच्याबरोबरच तिचे माता-पिताही रत्नागिरीत आले होते. खेड व रत्नागिरीतून आलेल्या कदम यांच्या सहकार्यांनी प्रवीण व प्रियांका यांना आणखी दोघांसह मारुती कारने (एमएच०४एसी८९२९) खेडकडे पाठविले. पाठीमागून मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन येत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार कदम पती-पत्नी, नरेश देवरुखकर व उमेश शेट्टी हे कारमधून निघाले. पानवलजवळ दुपारी १२.१० वाजता समोरून भरधाव वेगाने येणार्या ट्रॉलीतील जेसीबीचे इंजिन लोखंडी पंजासह सरकून कारवर पडले. या भीषण अपघातात धनश्रीचे माता-पिता प्रवीण व प्रियांका कदम आणि कारचे मालक नरेश देवरुखकर यांचा मृत्यू झाला.
युवतीसह माता-पित्याचा अपघाती मृत्यू दोन अपघात : संगमेश्वर, पानवल येथे दुर्घटना
By admin | Published: May 09, 2014 12:20 AM