बुलडाणा : खामगाव तालुक्यातील पाळा येथील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळेतही विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत शाळा व्यवस्थापनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल २० वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थिनींची निवास व्यवस्था वर्गखोलीतच करण्यात आली असून, या शाळेवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने शाळेला अनुदानाची खिरापत वाटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.पाळा येथील आदिवासी विभागाच्या निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या निवासासाठी योग्य व्यवस्था नव्हती, त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना रात्री वर्गखोलीतच झोपण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. ही बाबही पोलीस तपासात समोर आली आहे.दरम्यान, याच व्यवस्थापनाच्या दुसऱ्या शाळेचाही भोंगळ कारभार समोर आला आहे. अहल्याबाई होळकर शिक्षण संस्थेद्वारे चालविण्यात येत असलेल्या निवासी प्राथमिक आश्रमशाळेला १८ सप्टेंबर १९९६ रोजी मान्यता देण्यात आली आहे. या शाळेमध्ये १९९६ पासून विद्यार्थिनी राहतात. मात्र विद्यार्थिनींच्या निवासासाठी अद्याप स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. याकडे सामाजिक न्याय विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही डोळेझाक केली आहे. या प्रकाराला जबाबदार व्यवस्थापन व प्रशासनातील अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
आश्रमशाळेतील वर्गखोल्यांतच निवास व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2016 5:43 AM