महाड : किल्ले रायगडावरील सूर्योदयाची वेळ फुलांनी सजवलेल्या पुरातन वास्तू, जागोजागी तसेच शिवभक्तांच्या खांद्यावर फडकणारे भगवे ध्वज, शिवकालीन पेहरावातील शिवप्रेमी, शिवरायांचा जयघोष अशा मंगलमय वातावरणात आज तिथीनुसार ३४१ वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ज्येष्ठ शु. त्रयोदशी या दिवशी छ. शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडावर स्वत: राज्याभिषेक घडवून घेतला. हिंदवी स्वराज्यामधील हा सोन्याचा दिवस शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती वर्षापासून साजरा करीत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या आर्थिक सहकार्यातून साजऱ्या करण्यात आलेल्या या सोहळ्याला महाडचे आमदार भरत गोगावले, ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील, आ. सूर्यकांत दळवी, आ. रमेश म्हात्रे, जिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, जिप सदस्य सुषमा गोगावले, कोकण कट्टाचे अध्यक्ष सुरेश पवार, प्रशांत ठोसर, समितीचे अध्यक्ष सुनिल पवार, महेश मोरे, हमीदा खान, धारेश्वर महाराज, वाईकर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.मंगळवारी आणि आज बुधवारी या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन किल्ले रायगडावर करण्यात आलेले होते. राज्याभिषेकाच्या क्षणाची वाट पाहणाऱ्या शिवप्रेमींचे जथ्थे जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ जय - जय शिवरायच्या ललकाऱ्या देत ढोल ताशे आणि तुतारीच्या नादांवर बेधुंद नाचत राजदरबाराकडे कूच करीत होते. बघता बघता झुंजुमुंजू काळोख दूर झाला आणि सूर्योदय झाला. छत्रपतींच्या पालखीसोबत शिवरायांचे अष्टप्रधान मंडळाच्या वेशातील शिवप्रेमी आणि दुमदुमणाऱ्या नौबती गडावर शिवकाल अवतरण्याचा आभास निर्माण करीत होता. पालखीने नगरखान्यात प्रवेश करताच ब्राम्हणी वेद मंत्रोच्चार सुरु केले. आणि उपस्थित हजारो शिवभक्तांच्या साक्षीने राज्याभिषेकाचा सोहळा पार पाडला. यावेळी आ. भरत गोगावले यांनी छत्रपतींच्या या राजधानीकडे केंद्रशासनाच्या पुरातत्व विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. (वार्ताहर)
तिथीनुसार किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन
By admin | Published: June 12, 2014 1:22 AM