ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - राज्यातील अभिमत विद्यापीठातील आंग्लवैद्यक (एमबीबीएस) आणि दंतवैद्यक विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश ‘नीट’नुसारच होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या निर्णयामुळे शिक्षण सम्राटांना चांगलाच दणका बसला आहे. राज्यातील आठ अभिमत विद्यापीठांच्या दहा वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस आणि दंतवैदक अभ्यासक्रमाच्या जागा सामाईक प्रवेश पद्धतीनुसार परंतु ‘नीट’च्या मेरिटनुसार भरण्यात येणार आहेत. अभिमत विद्यापीठात मेडिकलच्या एकूण १८०० जागा असून त्यापैकी ८५ टक्के म्हणजे १ हजार ५३० जागांचे वैद्यकीय प्रवेश (एमबीबीएस आणि दंतवैद्यक) नीटनुसार होतील. यापूर्वी अभिमत विद्यापीठांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी परस्पर जाहीरात काढली होती. त्यालाही सरकारनं स्थिगती दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
तसेच राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश ‘नीट’नुसार करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला असून त्यानुसार १९ आॅगस्टपासून प्रवेश प्रक्रिया देखील सुरू केली आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या १७०० तर दंतवैदकच्या ४५० जागा आहेत. या जागांवरील प्रवेशांसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. शिनगारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांची तारांबळ सरकारने खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ‘नीट’ सुरू केली असली तरी मार्किंग सिस्टीममुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेले दोन्ही हेल्पलाईन नंबर बंद आहेत. २४ आॅगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे.
ही आहेत अभिमत महाविद्यालये -डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर, पुणे, नवी मुंबई -महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद आणि नवी मुंबई -भारती विद्यापीठ, पुणे, सांगली -कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड -प्रवरा मेडिकल कॉलेज, लोणी -जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, वर्धा