लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : तिथीनुसार साजरा करण्यात येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यामध्ये पसरायला हवी, अशी अपेक्षा राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी किल्ले रायगडावर बोलताना केली.शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने बुधवारी रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्र माला राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, आ. गौडा, आ. म्हात्रे, आ. भरत गोगावले, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते.पहाटे साडेपाच वाजता ध्वज पूजनाने या राज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ झाला. सकाळी ६ वाजता शिवप्रतिमेचे औक्षण केल्यानंतर, राजसदरेकडे शिवपालखीचे प्रस्थान झाले. सकाळी ८ वाजता राजसदरेवर राज्याभिषेक सोहळ्याचे विधी सुरू करण्यात आले. यावेळी शिवतारे यांनी याआधीच्या राज्याभिषेक सोहळ्यात सरदार घराण्याचे वंशज आपल्याला कुठे दिसले नाहीत. मावळ्यांचा जोश दिसला, पण पावित्र्यता दिसली नाही,असे टीकास्त्र सोडले. आ. भरत गोगावले यांनी किल्ले रायगडचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्व आमदार प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. याप्रसंगी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या शूरवीर सरदार घराण्यांच्या वंशजांचा गौरवचिन्ह देऊन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आाले.
रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
By admin | Published: June 08, 2017 6:27 AM