मुंबई - समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना अशाप्रकारे विधान करून राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड हे वादात अडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा परिषद आयोजित करण्यात येत आहे. त्या परिषदेत आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर हे विधान केले.
या विधानावरून वाद झाल्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. विनोद तावडे मंत्री असताना त्यांनी मुघलांचा इतिहास पाठ्यक्रमातून काढणार असं म्हटलं होते असं आव्हाडांनी दाखला दिला होता. आता त्यावरून विनोद तावडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. तावडे म्हणाले की, मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास नाही काढणार. मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही हे शिकवणे बंद करणार. मला जितेंद्र आव्हाडांचं लॉजिक कळालं नाही असं त्यांनी म्हटलं.
कसाब आला म्हणून करकरे, साळसकर, कामटे यांचं शौर्य दिसलं? असं आव्हाडांना म्हणायचं का. ते शूर होतेच. कसाबने यायची गरज नव्हती. मुघलांचा इतिहास म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही शिकवणे बंद केले पाहिजे असं विनोद तावडेंनी स्पष्टीकरण दिले. मात्र त्यावरून पुन्हा आव्हाडांनी ट्विट करून प्रामाणिकपणे कबुली दिल्याबद्दल तावडे यांचे आभार मानले. त्याचसोबत आव्हाडांनी म्हटलं की, जे आज सारवासारव करत आहात त्यातला एक शब्दही आपण बोलला नव्हता. छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास आपण काढणार असं मी म्हटलं नाही. मग महाराजांचा संघर्ष कुणा बरोबर झाला एवढाच प्रश्न? त्यांनी विनोद तावडेंना विचारला आहे.
विधान मागे घेणार नाही - आव्हाड माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. मी जे बोललो त्याचे संदर्भासहित हे स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडले. तुम्ही बदनामी करा बहुजन महापुरुषांची, आम्ही देऊ उत्तर. बहुजन इतिहास का डोळ्यात सलतो..करारा जवाब मिलेगा असे म्हणत आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करत मी माझ्या विधानावर ठाम आहे असल्याचं स्पष्ट केले आहे.