लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडीतील काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी १७ आरोपींविरोधात अखेर मंगळवारी ठाणे शहर पोलिसांनी ठाणे जिल्हा मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे दोषारोपपत्र जवळपास १० हजार पानी आहे. एखाद्या गुन्ह्यात ९० दिवसांच्या आता दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असले, तरी या प्रकरणी ठाणे पोलिसांना ४५ दिवस जास्त वाढवून मिळाले होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.भिवंडी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे फेब्रुवारीत मनोज म्हात्रे यांची प्राणघातक हल्ला करून हत्या झाली होती. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतरसुद्धा या हत्येप्रकरणी दिवसेंदिवस राजकीय हस्तक्षेप वाढू लागले होते. याचदरम्यान, हे प्रकरण ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग केले. त्यातच, या हत्येप्रकरणी २० जणांवर ठाणे शहर पोलिसांनी मोक्का लावला. तसेच या हत्येप्रकरणी ठाणे शहर सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्यासह ठाणे खंडणीप्रमुख एन.टी. कदम यांच्या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी धाडसत्र सुरू केले. यामध्ये म्हात्रे यांच्या अंगरक्षकासह मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे व या हत्येत सहभागी असलेल्या एकूण १७ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करुन अटक केली आहे. सध्या ते सर्व जण न्यायालयीन कोठडीत आहेत. याचदरम्यान, ठाणे शहर पोलिसांनी ठाणे न्यायालयात याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मिळावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने पोलिसांना ४५ दिवसांची मुदत वाढवून दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वी ठाणे शहर पोलिसांनी याप्रकरणी १७ अटकेतील आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तपास करताना पोलिसांना, हत्येसाठी वापरलेले शस्त्र, घटनास्थळी मिळालेले पुरावे, व्हायरल झालेली ती व्हिडीओ क्लिप, आरोपींचा कबुली जबाब आदी गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.
म्हात्रे हत्येप्रकरणी १७ जणांविरोधात दोषारोपपत्र
By admin | Published: July 05, 2017 4:39 AM