सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीत आरोपाचे पाट; जयंत पाटील म्हणतात त्यामुळेच भाजपसोबत, तर अजित पवार म्हणतात त्यापूर्वीच...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 06:11 AM2023-12-23T06:11:02+5:302023-12-23T06:11:23+5:30
पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत बसता, दाखवा तरी ७० हजार कोटी रुपये, त्यातील ३५ हजार कोटी तुला देऊन टाकतो, अशा उद्विग्न शब्दांत अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गाजलेल्या ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून एकेकाळचे मित्र असलेले जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात शुक्रवारी आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगलेला पाहायला मिळाला.
सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवारांनी दोन वेळा भाजपसोबत शपथविधी घेतल्याचा अप्रत्यक्ष दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. स्वतः पंतप्रधानांनीच भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर दोन-तीन दिवसांत आमचा पक्ष वेगळा झाला. २०१९ रोजी दीड-दोन दिवसांचे सरकार होते. त्या सरकारमध्येही काही प्रकल्पांना क्लीन चीट देण्याचे काम झाले, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीने सुरू केलेल्या ‘टू द पॉइंट पॉडकास्ट’ या मुलाखत कार्यक्रमादरम्यान पाटील यांनी हे आरोप केले. खासदार अमोल कोल्हे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गंभीर असतील तर खोलात जातील?
मी १५ वर्षे आघाडी सरकारमध्ये होतो. माझ्यासमोर हा भ्रष्टाचाराचा विषय आला नाही. त्यामुळे मी त्या खोलात कधी गेलो नाही. मात्र, ज्यांनी हे आरोप केले, त्यांच्यावर आता ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आहे.
देशाच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीने हा आरोप केल्याने ते गंभीर असतील तर याच्या खोलात जातील. त्यांचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे, आता त्यांनी नैतिकता सांभाळली पाहिजे, असा उपरोधिक सल्लाही जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे.
आरोपापूर्वीच भाजपबरोबर जाण्याचा निर्णय : पवार
जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांना अजित पवार यांनी शुक्रवारी मुंबईत पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. सिंचन घोटाळ्याच्या आरोपात काही तथ्य नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार गेले तेव्हापासूनच भाजपबरोबर जायचे चालले होते. त्यावेळीच सगळ्यांनी याबाबतच्या पत्रावर सह्या करून निर्णय घेतला होता, असा दावा अजित पवार यांनी केला.
पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, तेव्हा कुठला आरोप नव्हता. आरोप झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली. त्या श्वेतपत्रिकेत अनियमितता झाल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत, असे सांगत पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत बसता, दाखवा तरी ७० हजार कोटी रुपये, त्यातील ३५ हजार कोटी तुला देऊन टाकतो, अशा उद्विग्न शब्दांत अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले.
जिल्हा नियोजन मंडळात टक्केवारी
पुणे जिल्हा नियोजन मंडळात दिलेली कामे दोन वर्षे मंजूर होत नाहीत. मात्र, ठराविक पक्षाच्या लोकांना कामे दिली जातात, असा आपला अनुभव असल्याचे मुलाखतकार कोल्हे यांनी जयंत पाटील यांना विचारले असता, जिल्हा नियोजन मंडळात काही मंत्र्यांकडून टक्केवारी सुरू झाल्याचा आरोप पाटील यांनी केला.
या आरोपावर पवारांनी उत्तर दिले. मी पुण्याचा पालकमंत्री आहे. कुणी ०००.१ टक्के मागितले असल्यास दाखवा, राजकारण सोडेन, असे ते म्हणाले.