मुंबई : राज्यात १३०० कोटींची तूर खरेदी झालेली असताना दोन हजार कोटींचा घोटाळा झालाच कसा, असा सवाल करीत तूर भरडाईतील विरोधकांचा आरोप म्हणजे निव्वळ मनोरंजन आणि दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचा पलटवार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला. मंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.विरोधी पक्षातर्फे अंतिम आठवडा प्रस्ताव मंगळवारी सादर करण्यात आला होता. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तूर भरडाईमध्ये दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली होती. यावर सहकार मंत्री देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून भरडाईचे कंत्राट देताना कोणत्याही कंपनीवर मेहरनजर झालेली नाही. पारदर्शक पद्धतीने निविदा काढण्यात आली आहे. जास्तीतजास्त तूरडाळ उत्पादन होण्यासाठी पारदर्शी पद्धतीने निविदा काढण्यात आल्या, असे सांगत जास्तीतजास्त तुरीची भरडाई व्हावी यासाठी आणि गती वाढवण्यासाठी दुसऱ्या निविदा काढल्या.तुरीचे बंपर उत्पादन झालेल्या शेतकºयांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत ३६ लाख शेतकºयांच्या खात्यावर साडेचौदा हजार कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती सहकार मंत्र्यांनी या वेळी दिली. कर्जमाफी योजनेसाठी ७७ लाख खातेदारांनी नोंदणी केली असून ४८ लाख शेतकºयांची यादी तयार आहे यासाठी २३ हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असेही ते म्हणाले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा आदींनी विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत शासनाने केलेल्या विविध उपायययोजनांचे समर्थन केले.दरम्यान, मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर जोरदार आक्षेप घेत सप्तश्रृंगी कंपनीला नियम व अटी बदलून डाळ भरडायचे काम दिले याचे पुरावे देऊनदेखील कारवाई होत नाही. घोटाळा झालाच नाही, तर मग न्यायालयीन चौकशीला घाबरता का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
तूर घोटाळ्याचा आरोप, निव्वळ मनोरंजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 5:35 AM