अहमदनगर: अकोले तालुक्यात शिरपुंजे परिसरात महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पीडितेच्या संतप्त नातेवाईकांनी गावात आणून सिमेंटच्या बाकास बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर या आरोपीचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे.
शिरपुंजे येथील पीडित महिला मंगळवारी जनावरे चारण्यासाठी शिवारात गेली होती. तेथे दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी राजू गणपत सोनवणे (वय ४५) याने या महिलेवर अत्याचार केला व जंगलात पळून गेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडित महिलेल्या नातेवाईकांनी संध्याकाळी या आरोपीचा शोध घेऊन त्यास गावात आणले. त्यास सिमेंटच्या बाकड्यास बांधून मारहाण केली. या मारहाणीत तो जबर जखमी झाला. त्यानंतर त्यास राजूर येथे आणले.
तेथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. शिरपुंजे येथील पोलीस पाटील रंगनाथ काळू धिंदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.