अकोला - 'मर्चंट नेव्ही' अंतर्गत एअरपोर्ट सुपरवायझर पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून जिल्हय़ातील सुमारे ४00 बेरोजगारांची फसवणूक करणारा दिल्ली येथील 'अँकर एव्हिएशन अँण्ड मरीन अँकेडमी' कंपनीच्या संचालकास सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सोमवारी अटक केली. मनीषकुमारसिंह सतीशकुमारसिंह असे आरोपीचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला सोमवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एस. जांभळे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दिल्ली येथील ह्यअँकर एव्हिएशन अँण्ड मरीन अँकेडमीह्णद्वारे एअरपोर्ट सुपरवायझर या पदाच्या रिक्त जागांसाठी दोन महिन्यांपूर्वी ऑनलाइन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेसाठी जिल्हय़ातील सुमारे ४00 वर विद्यार्थ्यांनी १00 रुपये परीक्षा शुल्क भरून ऑफलाइन पद्धतीचे अर्ज डाक कार्यालयामार्फत अँकेडमीकडे पाठविले होते. अँकेडमीने या विद्यार्थ्यांची रविवार, २३ ऑगस्ट रोजी होलीक्रॉस शाळेत परीक्षा आयोजित केल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्यापूर्वी आणखी ३00 रुपयांची वसुली केली. काही विद्यार्थ्यांना ३00, काही विद्यार्थ्यांना २00 तर काहींना केवळ १00 रुपये मागितल्यामुळे परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ सुरू झाला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांंनी हा सर्व प्रकार फसवुणकीचा असल्याचा आरोप करीत परीक्षा केंद्रावर घोषणाबाजी केली. त्यानंतर या ४00 विद्यार्थ्यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यासमोर नारेबाजी करीत दिल्ली येथील ह्यअँकर एव्हिएशन अँण्ड मरीन अँकेडमीह्णच्या संचालकांविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीवरून सिव्हिल लाईन्स पोलिसांनी अँकेडमीचा संचालक मनीषकुमारसिंह सतीशकुमारसिंह याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याला सोमवारी अटक केली. त्यानंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एस. जांभळे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस गुरुवार, २७ ऑगस्टपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे.