वर्धा: नरभक्षी वाघीण हत्या प्रकरणातील आरोपी रामकृष्ण भगवान टेकाम याला न्यायालयाने जामिनावर मुक्त केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले असून, त्याच्या भेटीसाठी गावकऱ्यांनी घरी गर्दी केली होती. वनविभाग व शेतकऱ्यांची झोप उडवणारी नरभक्षी वाघिणी बोरगाव गोंडी येथील शेतकऱ्याने शेती संरक्षणासाठी सोडलेल्या विद्युत तारेत अडकून मृत झाली होती, या प्रकरणी वनविभागाने रामकृष्ण वर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून १६ पर्यंत वनकोठडी घेतली होती. न्यायालयीन कोठडीत असताना आज त्यांची जामिनावर सुटका झाली असल्याने ख-या अर्थाने या सुखद धक्याने दिवाळी गोड झाल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
बोर अभयारण्यातील नरभक्षक वाघिणीचा विजेचा करंट लागून अखेर मृत्यू झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहरी येथील शेतकरी भगवान टेकाम यांच्या ज्वारीच्या शेतात विद्युत प्रवाह लावला असता, त्या प्रवाहाच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. महत्वाचं म्हणजं बोर अभयारण्यातील नरभक्षक वाघिणीच्या दहशतीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी या वाघिणीला ठार मारण्याचा आदेशमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी वैध ठरवला होता. हा आदेश वैध ठरला असला तरी, सुरुवातीला वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचे प्रयत्न केले जाणार होते. यादरम्यान, वाघिणीने परत माणसांवर हल्ले केल्यास तिला ठार मारण्यात येणार होते. पण त्याआधीच विजेचा करंट लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपूरच्या जंगलातल्या या वाघिणीने गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 500 किलोमीटर्सचा प्रवास केला होता. मिळेल ती जनावरं मारून खाणाऱ्या या वाघिणीनं दोन माणसांचा जीव घेतला आणि वनविभागानं तिला ठार मारण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिला मारू नये अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे करण्यात आली होती.
अशी आहे प्रकरणाची पार्श्वभूमीया वाघिणीला ठार मारण्यासाठी तीनदा आदेश जारी करण्यात आले. तिन्हीवेळी डॉ. बनाईत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, दोनदा वन विभागाला न्यायालयाचा दणका सहन करावा लागला. पहिले दोन आदेश अवैध ठरविण्यात आले. परंतु, तिसरा आदेश वैध ठरला. ही वाघिण सुरुवातीला ब्रह्मपुरी वनक्षेत्रात होती. त्यावेळी तिने माणसांवर हल्ले केल्यामुळे प्रधान मुख्य वन संवर्धक (वन्यजीव) यांनी तिला ठार मारण्यासाठी गेल्या २३ जून रोजी पहिला आदेश जारी केला होता. तो आदेश न्यायालयात रद्द झाल्यानंतर तिला १० जुलै रोजी बेशुद्ध करून पकडण्यात आले. दरम्यान, तिला काही दिवस गोरेवाडा येथे निरीक्षणाखाली ठेवून २९ जुलै रोजी बोर अभयारण्यात सोडण्यात आले. तिने परत माणसांवर हल्ले सुरू केले. परिणामी, तिला ठार मारण्यासाठी ४ ऑक्टोबर रोजी दुसरा आदेश जारी करण्यात आला. न्यायालयाने दुसरा आदेश अवैध ठरवून तो रद्द करण्याची तंबी दिल्यानंतर वन विभागाने स्वत:च आदेश मागे घेतला होता. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी तिसरा आदेश जारी करण्यात आला. हा आदेश वैध ठरविण्यात वन विभागाला यश मिळाले होते.