लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भररस्त्यात चेतना कॉलेजच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे येथे शुक्रवारी घडला होता. यातील एकाने परिधान केलेले निळ्या रंगाच्या शर्टने पोलिसांना ‘क्लू’ मिळाला. त्यामुळे या प्रकरणी ‘त्या’ दोघा मोटारसायकलस्वारांच्या मुसक्या आवळण्यात गुरुवारी खेरवाडी पोलिसांना यश आले.उमेश चव्हाण (२४) आणि सुनील हरीश राठोड (१९) अशी अटक करण्यात आलेल्या दोन मुलांची नावे आहेत. चव्हाण हा वांद्रे पूर्वच्या ज्ञानेश्वरनगरचा, तर राठोड हा वाकोल्याचा राहणारा आहे. खेरवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास चव्हाणने पीडित विद्यार्थिनीला अश्लील स्पर्श केला, तर राठोड हा मोटारसायकल चालवत होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर परिमंडळ-९चे पोलीस उपायुक्त परमजितसिंह देहिया, तसेच खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकांची नियुक्ती केली गेली. वांद्रे पूर्वच्या कलेक्टर आॅफिस, आरएनए बिल्डिंगजवळ हा प्रकार घडला होता. निळ्या रंगाचे शर्ट घातलेल्या मुलाने पीडित मुलीशी अश्लील वर्तन केल्याचे तिने सांगितले होते. त्यानुसार सीसीटीव्हीची मदत घेत निळ्या रंगाचे शर्ट घातलेल्या चव्हाणची एन्ट्री विझिटर्स बुकवर, खेरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोहन कदम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पीओपी कंत्राटदाराकडे मजुरीचे काम करणाऱ्या चव्हाण आणि नंतर राठोडला पकडले. या प्रकरणी गेले तीन दिवस सतत जवळपास ४० जणांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.शुक्रवारी दुपारी कॉलेजच्या दिशेने निघालेल्या मुलीसोबत हा प्रकार घडला होता. चव्हाण आणि राठोड हे दोघे मोटारसायकलवरून आले होते. सीसीटीव्हीच्या आधारे दोन मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांचा सहभाग नसल्याचे समजताच त्यांना सोडून दिले.
निळ्या रंगाच्या शर्टमुळे सापडला आरोपी
By admin | Published: July 14, 2017 5:41 AM