गुजरात पोलिसांचे पथक धुळ्यात : आरोपीसह ठिकाणाची केली पाहणीधुळे : गोध्रा हत्याकांड प्रकरणातील आरोपी इम्रान बटुक हा सात वर्ष धुळ्यात आश्रयाला होता़ तसेच इतर माहितीही गुजरात पोलिसांच्या हाती लागली आहे़ त्यानुसार गुजरात पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी आरोपीला घेऊन शनिवारी सकाळी धुळ्यात दाखल झाले़ पथकाने बटुक यांच्या हजारखोली कामगार नगर परिसरातील सासरवाडीत चौकशी देखील केली़ याबाबत कोणतीही माहिती देण्यास तपास यंत्रणेनेकडून नकार देण्यात आला़ इम्रान अहमद बटुक याला १३ जुलै रोजी गुजरात पोलिसांनी मालेगाव येथून अटक केली़ बटुक हा गोध्रा कांडांनंतर फरार होऊन धुळ्यात आश्रयाला होता़ त्याचे चाळीसगाव रोड परिसरातील नॅशनल उर्दु हायस्कूल परिसरात वास्तव्य होते आणि तो भंगाराच्या दुकानात काम करीत होता़ अशी माहिती आहे. २००२ ते २००८ या कालावधीत धुळ्यातच लपून होता़ त्याने धुळ्यातील एका अमिनाबानो नामक मुलीशी विवाह करून संसार थाटला होता़ विवाहानंतर तो मालेगाव येथे गेला असल्याची माहिती गुजरात पोलिसांकडे आहे़ गुजरात एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक जे़ बी़ रावल, एक अन्य अधिकारी आणि चार गार्ड यांच्या समवेत इम्रान बटुकला शनिवारी सकाळी धुळ्यात आणण्यात आले़ त्याला येथील जिल्हा सर्वोपचार रूग्णालयातही नेण्यात आले होते़ गुजरात पोलिसांचे पथक सायंकाळ उशीरापर्यंत कामगार नगर परिसरात चौकशी करीत होते.
गोध्रा हत्याकांडातील आरोपी धुळ्यात होता आश्रयाला
By admin | Published: July 16, 2016 10:07 PM