मुंबई : एकाच खटल्यामधील सहआरोपीच्या कबुलीजबाबाची प्रत मिळवण्याचा अधिकार आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने सीबीआयला शीना बोरा हत्येप्रकरणातील आरोपी संजीव खन्ना याने दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी संजीव खन्ना याने इंद्राणी मुखर्जीचा आधीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने सीबीआयला दिलेल्या कबुलीजबाबाची प्रत मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती.सीबीआयच्या वकील पूर्णिमा कंथारिया यांनी यावर आक्षेप घेतला. खन्नाला श्यामवर रायच्या कबुलीजबाबाची प्रत आता देणे शक्य नसल्याचे अॅड. कंथारिया यांनी न्या. जाधव यांना सांगितले. ‘आम्ही त्याला कबुलीजबाबाची प्रत नंतर देऊ. आता तपास सुरू आहे. आरोपपत्र दाखल केल्यानंतर रायने कबुलीजबाब दिला आणि काही दिवसांपूर्वीच त्याला माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर करण्यात आले आहे,’ असा युक्तिवाद अॅड. कंथारिया यांनी केला.‘खटल्यातील सहआरोपीचा कबुलीजबाब किंवा साक्षीदाराच्या साक्षीची प्रत मिळविण्याचा आरोपीचा अधिकार आहे. कारण संबंधित कबुलीजबाब किंवा साक्ष खटल्यात पुरावा म्हणून सादर केली जाणार असते,’ असे निरीक्षण न्या. जाधव यांनी नोंदवले.खन्नाच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी न्या. जाधव यांनी सीबीआयला एका आठवड्याची मुदत देत या याचिकेवरील पुढील सुनावणी ३० जून रोजी ठेवली.रायच्या कबुलीजबाबाची प्रत मिळावी, यासाठी खन्ना याने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. (प्रतिनिधी)
आरोपीलाही कबुलीजबाब मिळवण्याचा अधिकार
By admin | Published: June 25, 2016 3:29 AM