मंद्रुप : खून झाल्याच्या संशयावरुन नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर बुधवारी पोलिसांनी संबंधित मृतदेह तब्बल दीड वर्षांनी जमिनीतून उकरुन काढला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील रहिवासी मौला बापू बागवान यांचे २५ मार्च २०१८ रोजी निधन झाले होते. मात्र मौला यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्यांना ठार मारल्याचा संशय त्यांचा भाचा अब्बास हनीफ बागवान यांनी केला होता. अब्बास रितसर मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेला असता पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. त्यामुळे अब्बासने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात आपली बाजू मांडताना अब्बास याने फियार्दीत यासीन, सिकंदर, जाईबून या नातेवाईक मंडळीवर संशय घेतला होता. अखेर अठरा महिन्यानंतर सोलापूर जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन कोटार्ने मयत मौला बागवान यांच्या मृतदेहाचा पंचनामा करण्याचा आदेश पोलिसांना दिला.
त्यानुसार मंद्रुप पोलिसांनी बुधवारी सकाळी स्मशानभूमीतील प्रेताचा सांगाडा उकरून काढला. यावेळी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली धांडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी मंद्रुप येथील बसस्थानकाजवळील मुस्लिम स्मशानभूमीतच पंचनामा केला.