ऑनलाइन लोकमत -
नवी मुंबई /कल्याण, दि. 22 - केरळमधील तरुणांना इसीस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी अर्शीद कुरेशी याला अटक करण्यात आली आहे. केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अर्शीद कुरेशी हा इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा सदस्य असल्याचीही माहिती मिळत आहे. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही झाकीर नाईक यांची संस्था आहे.
अर्शीद कुरेशीचे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनसोबत असलेले संबंध उघडकीस आले तर झाकीर नाईकच्या संस्थेशी संबंधित व्यक्तीची ही पहिली अटक असेल. बांगलादेशातील ढाका शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईक तपासयंत्रणांच्या रडारवर आहेत. आर्टिसन बेकरीतील हत्याकांडात सक्रिय सहभाग असलेल्या पाच बांगलादेशी अतिरेक्यांपैकी एकाने झाकीर नाईक यांच्या प्रवचनांपासून आपण प्रेरित झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर एनआयएने त्यांची भाषणे, लिखाण तसेच त्यांच्या संस्थेचे कार्य यांची तपासणी सुरू केली आहे.
अर्शीद कुरेशीच्या सीवूड्समधील फ्लॅटवर छापा टाकून त्याला अटक करण्यात आलं. सीबीडी-बेलापूरमधील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र एटीएस अर्शीद कुरेशीची चौकशी करणार असून त्यानंतर त्याला केरळमध्ये नेण्यात येणार आहे.
एबीन जॅकोब याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याला इस्लाममध्ये धर्मांतरण करुन इसीसमध्ये भरती होण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. एबीन जॅकोबची बहिण मरिअम आणि तिचा पती बेस्टीन विन्सेट केरळमधून बेपत्ता आहेत. धर्मांतरण करण्यास जबरदस्ती करणा-यांमध्ये बेस्टीन आणि अर्शीद कुरेशीचा सहभाग होती असं एबीन जॅकोबने पोलिसांना सांगितलं आहे.
एबीन जॅकोबसा अर्शीद कुरेशीची भेट घेण्यासाठी बेस्टीनने सांगितलं होतं. 2014 मध्ये बेस्टीन जॅकोबला मुंबईत घेऊन गेला. कुरेशीचं घर मुंबईत आहे. त्याने जॅकोबसमोर सर्व धर्मांची तुलना केली. सर्व धर्मांमध्ये इस्मालचं स्थान सर्वोच्च आहे, भारतात लोक चुकीचं आयुष्य जगत आहेत असं सांगत कुरेशीने त्याला धर्मांतरण करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र जॅकोब त्याच्या बोलण्याला भुलला नाही आणि केरळला परतला.