लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वॉर्डन मंजुळा शेट्येच्या हत्येप्रकरणी जेलर मनीषा पोखरकरसह सहाही आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात मंजुळाची साडी सापडली आहे. मात्र, काठीचे गूढ कायम आहे. कारागृहातील दोन हवालदारांनी अन्य चार पुरुष कैद्यांच्या मदतीने काठीसह अन्य पुरावे कचऱ्याच्या गाडीत फेकून दिल्याचा खुलासा अॅड. नितीन सातपुते यांनी केला आहे. मंजुळाच्या हत्येप्रकरणी जेलर मनीषा पोखरकर, पोलीस शिपाई बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे या सहा जणींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी त्यांची कोठडी संपल्याने त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. तक्रारदार मरियम शेखने दिलेल्या जबाबानुसार, दोन अंडी आणि पाच पावांच्या हिशोबावरून मंजुळाला २३ जून रोजी विवस्त्र करून लाठीने, लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. यादरम्यान आरोपींनी तिच्या गुप्तांगात काठी घातली. त्यामुळे तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव झाला. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने तपास सुरू केला.तपासात ६ जुलै रोजी गुन्हे शाखेला सापडलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये सहाही आरोपींच्या हातात काठी आढळून आली. आरोपींच्या चौकशीत त्यांनी ती काठी महिला कारागृहाच्या कार्यालयातच ठेवल्याचे सांगितले. मात्र कार्यालयात ती काठी सापडली नाही. याबाबत महिला कैद्यांकडे चौकशी केली तेव्हा २४ जून रोजी बंदोबस्तासाठी आलेल्या एका महिला जेलरच्या हातात ती काठी दिसून आल्याचे समोर आले. संबंधित जेलरकडे चौकशी केली असता, त्यांनी कारागृहातील कार्यालयात असणाऱ्या एका काठीचा वापर केला. बंदोबस्तानंतर ती काठी कोठे ठेवली? कोणाला दिली? याबाबत काही आठवत नसल्याचे सांगितले. काठीच्या शोधासाठी भायखळा कारागृहाची व स्टोअर रूमच्या झडतीत मंजुळाची साडी सापडली. मारहाण झाली त्या दिवशी ती हीच साडी नेसली होती. आरोपींच्या घरझडतीत ही काठी सापडली नाही. कारागृहातून ताब्यात घेतलेल्या एनव्हीआरमधील सर्व कॅमेऱ्यांचे फूटेज कलिनातील फॉरेन्सिक लॅबमधून मिळालेले नाही. ते मिळाल्यानंतर काठीचा शोध घेतला जाईल. त्यामुळे तूर्तास शोध थांबवण्यात आला आहे. मंजुळा हत्याप्रकरणात आरोपींकडील तपास पूर्ण झाला असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी तक्रारदार महिला कैदी मरियम शेखतर्फे आरोपींविरुद्ध याचिका दाखल केलेले अॅड. नितीन सातपुते यांनी एक दिवसाच्या वाढीव कोठडीची मागणी केली. काठीसह अन्य आरोपीचा शोध घेणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कैदी आणि पोलिसांच्या मदतीने काठी गायब...अॅड. नितीन सातपुते यांनी आरोपी रमेश कदम याने मुख्यमंत्र्यांना केलेल्या पत्राचा उल्लेख या वेळी केला. कदमच्या तक्रारीनुसार, २३ जूनला मंजुळाची हत्या झाली. २४ जूनच्या रात्री बरॅक क्रमांक ३मधील हत्येच्या गुन्ह्यातील कैदी गुलाब यादव, चंद्रप्रकाश यादव, सुभाष यादव आणि मंडल यांना सुभेदार अरुण जाधव, हवालदार बनसोडे यांनी बाहेर काढले. त्या वेळी कदम हा बरॅक क्रमांक ४मध्ये होता. बाहेर काढलेल्या चौघांनी बरॅकमधील, पॅसेजमधील मारहाणीतील पुरावे तसेच काठी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. रक्ताचे डाग पुसून टाकले. हाच कचरा २५ जूनला सकाळी कचरावाहू गाडीत फेकून दिला. तेथील सीसीटीव्हीत हा घटनाक्रम कैद असल्याचे सातपुते यांनी सांगितले. >महिला खासदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटभायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी संसदीय महिला सशक्तीकरण समितीतील महिला खासदारांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आसामच्या खासदार बिजोया चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील सुमारे ३० महिला खासदारांच्या पथकाने गुरुवारी भायखळा कारागृहाची पाहणी केली होती. दोन तासांच्या या पाहणी दौऱ्यात कारागृहातील महिला कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून समितीने कैद्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा, महिला कैद्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला.या पाहणी दौऱ्याची माहिती देण्यासाठी समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी बिजोया चक्रवर्ती यांच्यासह महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, भाजपाच्या रक्षा खडसे आदी महिला खासदार या वेळी उपस्थित होत्या. राज्य सरकार मंजुळा हत्याप्रकरणाची चौकशी करत असून यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी समिती सदस्यांना दिली. >‘त्या’ १६ जणींमध्ये इंद्राणीही...दंगलीच्या गुन्ह्यात कैद्यांच्या जबाबासाठी न्यायालयाकडून मिळालेल्या परवनागीमधील १६ जणींमध्ये इंद्राणी मुखर्जीचाही समावेश आहे. या १६ जणी शिक्षित आहेत. २४ जून रोजी घडलेल्या दंगलीमागे १६ जणींची महत्त्वाची भूमिका आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहेत.
आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत
By admin | Published: July 15, 2017 5:28 AM