अहमदनगर : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या प्रसंगाच्या काहीवेळ आधी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास या घटनेतील मुख्य आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे दुचाकीवरून घटनास्थळाजवळून रस्त्यावरून जाताना पाहिल्याचे एका साक्षीदाराने बुधवारी न्यायालयात सांगितले़ कोपर्डी खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू असून बुधवारी सरकारी पक्षाच्यावतीने अॅड़ उज्ज्वल निकम यांनी तिघांची साक्ष घेतली़ यातील एका साक्षीदाराने सांगितले की, १३ जुलै रोजी मी मित्रासमवेत कोपर्डी कुळधरण रस्त्याने फिरायला गेलो होतो़ यावेळी जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे यांनी दुचाकीवरून या रस्त्याने तीन ते चार चकरा मारल्या़ याबाबत त्यांना विचारले असता आमची चावी हरवल्याचे त्यांनी सांगितले़ जितेंद्र शिंदे काम करत असलेल्या कोपर्डी येथील विटभट्टी मालकाची साक्ष घेण्यात आली़ त्यांनी सांगितले की, जितेंद्र शिंदे याला दुचाकी घेण्यासाठी ४० हजार रुपयांची उचल दिली होती़ ११ जून रोजी शिंदे याने विकत घेतलेली निळ्या रंगाची दुचाकी घेऊन तो मला दाखविण्यासाठी आला होता़ तिसरी साक्ष कुळधरण रुग्णालयात मृताच्या पंचनाम्यादरम्यान उपस्थित असलेल्या महिलेची झाली़ तिने सांगितले की, १४ जलै रोजी पहाटे रुग्णालयात पोलिसांनी मला पंच म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली होती़ मृत मुलीच्या अंगावर जखमा होत्या. या साक्षीदारांची आरोपी पक्षाच्यावतीने उलटतपासणी घेण्यात आली़ खटल्याची शुक्रवारी सुनावणी होणार आहे़ (प्रतिनिधी)
घटनेपूर्वी त्याच रस्त्याने दिसले आरोपी
By admin | Published: February 16, 2017 3:56 AM