उरण : न्यूयॉर्क सिटीमधील ब्रॉडवे डान्स सेंटर संस्थेत सहा महिन्यांपूर्वी नृत्य दिग्दर्शकाचे धडे गिरवण्यासाठी गेलेल्या उरण तालुक्यातील बोकडविरा गावच्या अजिंक्य पाटील याने आऊटस्टँडिंग स्टुडंट पारितोषिक पटकावले आहे. उरणचे नाव सातासमुद्रापार पोहोचविण्याचा पराक्रम करणाऱ्या अजिंक्यवर मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अजिंक्य पाटील या उरण तालुक्यातील २५ वर्षांच्या तरुणाला आंतरराष्ट्रीय हॉलीवूडमध्ये ख्याती असलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमधील ब्रॉडवे डान्स सेंटर संस्थेने नृत्य दिग्दर्शकाचे धडे गिरविण्यासाठी आमंत्रित केले होते. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अजिंक्य पाच महिन्यांपूर्वी न्यूयॉर्क सिटीकडे गेला आहे. नृत्य प्रशिक्षणाची आवड असल्याने २०१० साली अजिंक्यने देशातील बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक डावर यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले. प्रशिक्षणादरम्यान अजिंक्यने छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमातून नृत्याची छाप पाडली. त्यानंतर त्याने बोकडविरा येथे नृत्य प्रशिक्षण देणारी अॅकॅडमीही सुरू केली. अॅकॅडमीत नृत्याचे धडे देण्याबरोबरच मुंबई, नवी मुंबई, पनवेलमध्येही काही संस्थांमध्ये नृत्य प्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन देण्याचेही काम केले. त्याचबरोबर झुंबा एरोबिक पद्धतीने नृत्याचे धडे देणाऱ्या संस्थेकडूनही अजिंक्यने मार्गदर्शक म्हणूनही काम केले.अजिंक्यच्या कलागुणांची पारख करून त्याला आंतरराष्ट्रीय हॉलीवूडमध्ये ख्याती असलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमधील ब्रॉडवे डान्स सेंटर संस्थेने नृत्य दिग्दर्शकाचे धडे गिरविण्यासाठी आमंत्रित के ले होते. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणात अजिंक्यने नृत्य शिक्षक बोनी हरेक्सन आणि डेरेक मिशेल यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरवले आणि जागतिक पातळीवरील प्रशिक्षणासाठी आलेल्या नृत्य कलाकारांमधून आऊटस्टँडिंग स्टुडंटचे पारितोषिक पटकावले. (वार्ताहर)
अजिंक्यचा सातासमुद्रापार झेंडा
By admin | Published: June 29, 2016 2:14 AM