मुंबई - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघातील इच्छुकांच्या तयारीचा वेग वाढला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपुर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या मतदारसंघाच्या निर्मितीपासून निम्मा कालावधी अचलपुरात अपक्ष उमेदवारांनी नेतृत्व केलं असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेचं राजकीय पक्षांनी यावेळी अचलपुरात कंबर कसली असल्याचे दिसत आहे.
अचलपूर व चांदूर बाजार असे दोन तालुके असलेला हा मतदारसंघ आहे. स्वतंत्र राज्याच्या निर्मितीनंतर आतापर्यंत या मतदारसंघात १२ विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत ६ वेळा मतदारांनी अपक्ष उमेदवारांना संधी दिली असल्याचे दिसून आले. तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे आमदार बच्चू कडू हे सलग तीन वेळेपासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत.
अचलपूर मतदारसंघात १९६२ मध्ये पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले माजी आमदार आमसाहेब वाटेणे यांना मतदारांनी संधी दिली होती. त्यावेळी त्यांना ३० हजार १८४ मते मिळाली होती. तर त्यांच्याविरुद्ध मैदानात असलेले काँग्रेसचे कृष्णराव देशमुख यांचा २ हजार १२८ मतांनी पराभव झाला होता. त्यांनतर आजपर्यंत अनेकदा या मतदारसंघाने अपक्ष उमेदवाराला नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.
अचलपूर मतदारसंघात आजपर्यंत अपक्ष वेतिरिक्त तीन वेळा काँग्रेस,दोन वेळा भाजप व एकदा कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र मतदारसंघाचा इतिहास पहिला तर, मतदारांचा अपक्षांवरच अधिक विश्वास असल्याने विविध राजकीय पक्ष जनतेच्या पसंतीस खरे उतरले नसल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत 'या' मतदारसंघातील मतदार अपक्ष उमेदवाराला निवडणून देण्याचा इतिहास कायम ठेवणार किंवा बदल घडवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.