शिवसेना, राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसला अच्छे दिन; विरोधी पक्षनेतेपद मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 08:26 AM2023-07-14T08:26:34+5:302023-07-14T08:27:08+5:30
राहुल गांधी यांना ठोठावलेल्या शिक्षेबद्दल केलेल्या काँग्रेसच्या मौन आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
काँग्रेसलाच आले अच्छे दिन
ज्याचे संख्याबळ अधिक त्यांचाच विरोधी पक्षनेता होणार असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितल्याने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादीतील फाटाफुटीत काँग्रेसलाच अच्छे दिन आल्याचे दिसू लागले आहे. काँग्रेसला पद मिळणार नक्की. पण ते द्यायचे कोणाला याचा तिढा सोडवणे मात्र कठीण होईल, इतके स्पर्धक रांगेत आहेत. अशा निवडीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याबरोबरच अनेक पद्धतीचे समतोल सांभाळावे लागतात. त्यात श्रेष्ठींची कसोटी लागणार, हे नक्की.
पवारांच्या नव्या पिढीची क्रेझ
राहुल गांधी यांना ठोठावलेल्या शिक्षेबद्दल केलेल्या काँग्रेसच्या मौन आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिल्लीतून शरद पवार यांना सांभाळून घेण्याचे संकेत राज्यातील नेत्यांना दिल्यानंतर पवारांनीही राज्यात काँग्रेससोबत जाण्याचे धोरण स्वीकारल्याचे यातून दिसून आले. पवार कुटुंबातील पुढच्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून रोहित यांच्याबद्दल काँग्रेसच्या अनेक नेत्यांत क्रेझ असल्याचे यावेळी दिसून आले. आंदोलन स्थळाजवळ त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यातून आणि नंतर टपरीवर चहा घेण्यातून त्याचा प्रयत्य आला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील नाते आणखी घट्ट होईल याचा विश्वास काँग्रेसच्याच नेत्यांना वाटू लागला आहे.
मेरा काम; मेरी पहचान...
मुंबईकरांकडून आमदारांच्या कामांचे मूल्यमापन केले जात असतानाच नुकतेच प्रजा फाउंडेशनने सादर केलेल्या अहवालात सर्वात वाईट कामगिरी केलेले आमदार म्हणून शिंदे गटाचे दिलीप लांडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यात त्यांचे विरोधक काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांच्या फॉलोअर्सने प्रजा फाउंडेशनच्या २०१७ च्या अहवालाचा दाखला देत नसीम खान यांची कामगिरी उजवी असल्याचे कॅम्पेन सोशल मीडियावर सुरू केले आहे. त्यामुळे अवघ्या काही मतांनी निवडून आलेले आमदार दिलीप लांडे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढा विधानसभेतील मतदारांनी वाचण्यास सुरुवात केली असून, या निमित्ताने पुन्हा एकदा खान आणि लांडे सोशल मीडियासह प्रत्यक्षात देखील आमने-सामने आले आहेत.