ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 11 - सिंहगड रोडवरील नांदेड गाव व नांदेड सिटी या परिसरातील लोकांना गेल्या एक महिन्यांपासून त्रास देणा-या आणि जवळपास २० ते २५ जणांना चावा घेऊन दहशत निर्माण करणा-या माकडाला पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले़ कात्रज येथील अनाथालयाचे स्वयंसेवी कार्यकर्ते, वन विभागाच्या कर्मचा-यांनी ग्रामस्थांच्या मदतीने हे ऑपरेशन पार पाडले.
नांदेड गावातील लोकांना गेल्या एक महिन्यांपासून या माकडाने त्रस्त केले होते. त्यामुळे लोक हातात बांबू घेऊनच घरातून बाहेर पडत होते. यापूर्वी वन विभागाच्या कर्मचा-याने या माकडाला पकडण्याचा दोन वेळा प्रयत्न केला होता. तेथे पिंजराही लावला होता. पण, तो अयशस्वी ठरला होता़
कात्रज येथील सर्प उद्यानाचे नीलमकुमार खैरे व त्यांचे सहकारी आणि वन विभागाच्या कर्मचारी या माकडाला पकडण्यासाठी दुपारी एक वाजता नांदेड गावात पोहचले. विलास लगड व अन्य ग्रामस्थांनी त्रास देणारे हे माकड दाखविले. त्याचवेळी ते माकड लोकांकडे चालून आले. हे पाहताच रेक्यु ऑपरेशनमधील डॉ. अंकुश दुबे यांनी त्याच्या दिशेने एक डॉट (भुलीचे इंजेक्शन)मारला.
ते बरोबर बसले. पण, माकडाच्या वजनाच्या मानाने हा डोस कमी होता. त्यामुळे ते माकड एका झाडावरुन दुस-या झाडावर उड्या मारु लागले़ वन कर्मचारी तसेच सर्पउद्यानाचे कार्यकर्ते केविन, महेश देशपांडे, संतोष पोतदार, राजाराम सणस, मधुकर जयकर, ज्ञानेश्वर हिरवे व स्वत: नीलमकुमार खैरे हे त्याच्या मागोमाग फिरत होते.
नांदेड सिटीच्या जवळून एक नाला आहे. माकडाच्या मागे मागे जाताना या कार्यकर्त्यांना अनेकदा हा नाला ओलांडावा लागला. त्यानंतर दुपारी चार वाजता तो नांदेड सिटीच्या सांडपाणी प्रक्रिया युनिटच्या तारेच्या कुंपणावर चढला होता़ त्याचवेळी डॉ. दुबे यांनी दुसरा डॉट मारला. तो बरोबर लागला त्यानंतर पाच मिनिटात तो बेशुद्ध झाला़ जाळीमधून त्याला गाडीत ठेवण्यात आल्यावर शुद्धीवर येण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्याला कात्रज येथील अनाथालयात आणण्यात आले़
या माकडाची तपासणी करण्यात आली असून तो पूर्ण तंदुरुस्त आहे़ सध्या त्याला कात्रज अनाथालयातच पिंज-यात ठेवले असून तो शांत आहे़ लवकरच जेथे माकडांचे जास्त कळप आहेत, अशा ठिकाणी सोडून देण्यात येईल, अशी माहिती नीलमकुमार खैरे यांनी सांगितली़
माणसांवरच तो करत होता हल्ले
हे माकड सात ते आठ जणांच्या कळपासह या परिसरात वावरत होते. माणसं आपल्याला मारतात, हे या माकडाच्या डोक्यात पक्के बसले होते. त्यामुळे माणसांवरच तो हल्ला करीत होता. आम्ही रेक्यु ऑपरेशनला गेलो़ तेव्हा एका मुलाने माझ्यावर हल्ला केल्याचे सांगितले़ आम्ही त्याला पुढे केल्यावर ते तातडीने झाडावरुन उतरुन आमच्या दिशेने धावत आले़ त्याबरोबर आम्ही त्याला इंजेक्शन दिले़ - नीलमकुमार खैरे, तज्ज्ञ