ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २७ - इंटरनेटचा वाढता प्रभाव, सोशल मीडियाची वाढती लोकप्रियता आणि स्मार्टफोनचा वाढता वापर, यामुळे आमूलाग्र बदल घडून आला असून, ‘ई-शॉपिंग’च्या माध्यमातून दैनंदिन जीवनात वापरल्या जाणा-या बहुतांश वस्तू आॅनलाइन खरेदी करण्याचा फंडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ही बाब फायदेशीर ठरणारी असल्याने, ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांनी जाहीर करण्यात केलेल्या विविध सवलतींच्या योजनांमुळे, दिवाळीपूर्वीच संकेतस्थळांवर दिवाळी सुरू झाली असून, शहरातील ३३ कुरियर सेवा केंद्रांतून दिवसाला किमान २00 वस्तूंचा पुरवठा संबंधित ग्राहकांना केला जात ग्राहकांना केल्या जाणा-या वस्तूंच्या पुरवठ्यामुळे आॅनलाइन बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. वर्षभरात आॅनलाइन शॉपिंग करणा-यांची टक्केवारी वाढत चालली आहे. त्याचबरोबर त्यांच्या शॉपिंग खर्चातही वार्षिक १८ ते २१ टक्क्यांची वाढ होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही वर्षात ग्राहकांकडून होणा-या खरेदीच्या ट्रेंडमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. इंटरनेटची गती आणि मोबाइल बाजारपेठेचा विस्तार करणाºया ‘थ्री-जी’, ‘फोर-जी’ सेवा मिळू लागल्याने ग्राहकांच्या सवयी आणि आवडी-निवडीवर त्याचं प्रतिबिंब पडलं. दैनंदिन गरजा भागवित असताना लागणा-या वस्तूंची ‘स्मार्ट’ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. नेमका हाच मुद्दा ओळखून ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांनी आॅनलाइन खरेदीचा फंडा ग्राहकांसमोर मांडला. दिवाळीतल्या खरेदीचा ओघ लक्षात घेऊन ‘ई-दिवाळी’चा नवा ट्रेंड आला. सणासुदी दरम्यान ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांनी जाहीर केलेल्या विविध सवलतींच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडून आॅनलाईन खरेदीला विशेष पसंती दिली जात आहे. दोन वर्षांपूर्वी आॅनलाइन वस्तू खरेदी करण्याची सुविधा केवळ वेब पोर्टलवरच मर्यादित होती; पण आता ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांनी मोबाइल अॅप्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या स्मार्ट फोनमध्ये जागा मिळविली असून, आकर्षक डिजिटल जाहिराती, सवलती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांची अक्षरश: दिवाळीच त्या साजरी करताना दिसत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना नेटिझनचाही प्रतिसाद मिळतो आहे. ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांनी पाठविलेल्या वस्तू संंबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अकोला शहरात ३३ खासगी कुरियर सेवा केंद्र आहेत. दीपोत्सवाची चाहूल लागताच या कुरियर सेवा केंद्रांतून दिवसाला किमान २00 वस्तूंचा पुरवठा संबंधित ग्राहकांना केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दीपावलीनिमित्त अतिशय स्वस्त दरात वस्तूंची विक्री करण्यासाठी विविध सवलतींच्या योजनांची घोषणा केली जात असल्याने ग्राहकांचा अधिकच ओढा त्याकडे वाढला तयार कपडे, पुस्तकं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फॅशन अक्सेसरीजच्या आॅनलाइन खरेदी-विक्रीपासून सुरू झालेला हा प्रवास अगदी मोटारी, फर्निचर इतकंच नव्हे, तर सदनिकापर्यंत येऊन ठेपला आहे.