मुंबई : बँगकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनिटने तस्करीतले तब्बल नऊ किलो सोने हस्तगत केले. हस्तगत केलेल्या सोन्याची किंमत २ कोटी ३२ लाख इतकी आहे. भूपती कन्नन असे या प्रवाशाचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. भूपतीला या तस्करीसाठी साडेचार लाख रुपयांचे कमिशन मिळणार होते. या आर्थिक वर्षातली एआययूने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.भूपती बँगकॉकहून छत्रपती शिवाजी टर्मिनन्सवर उतरला. गेल्या तीन महिन्यांत १३ वेळा थायलंडची सैर करणा-या भूपतीवर एआययूला संशय होता. त्यामुळे विमानतळावर उतरताच एआययू अधिकाऱ्यांनी त्याची झाडाझडती सुरू केली. अधिकाऱ्यांनी एका झटक्यात भूपतीकडील ९ किलो ३१० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चेन शोधल्या. कारण हा साठा भूपतीने आपल्या कार्गो पॅन्टच्या खिशात ठेवला होता. सोन्याचा इतका मोठा साठा आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवून तो सहजपणे कसा उतरला, याचे एआययू अधिकाऱ्यांना आश्चर्य आहे. या आर्थिक वर्षातली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहिती एआययूचे अपर आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी दिली. (प्रतिनिधी)
विमानतळावरून तब्बल ९ किलो सोने हस्तगत
By admin | Published: January 16, 2015 6:27 AM