मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडविणारे अजित पवार यांनी आपले जुने सहकारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेवरून टोला लगावला आहे. अधिक गुण घेणारा विद्यार्थी व्यवहारात हुशार असतोच असं काही नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी फडणवीसांवर टीका केली. नाशिक येथील विभागीय बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
कमी गुण घेणारा विद्यार्थी व्यवहारात हुशार असतो. पण अधिक गुण घेणारा व्यवहारात हुशार असतो असं काही नाही, फडणवीसांनी दुसऱ्यांदा स्थापलेले सरकार त्याचे उत्तम उदाहरण असल्याचा टोला अजित पवार यांनी फडणवीसांचे नाव न घेता लगावला. त्यामुळे एकच हशा पिकला होता.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. यात भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला होता. मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरकार स्थापन्याची चर्चा सुरू होती. मात्र ऐनवेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
दरम्यान अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांना रुचला नाही. त्यामुळे अजित पवार आणि फडणवीस बहुमत सिद्ध करू शकले नाही. त्यानंतर फडणवीसांना पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र अजित पवार महाविकास आघाडीतूनही पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.