अकोला : अकोल्यातील डाळीला देशभरातील विविध राज्यातून प्रचंड मागणी आहे. वऱ्हाड परिसरात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जात असल्याने, अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत गत अनेक वर्षांपासून डाळ उद्योगाचा विस्तार झाला. शेकडोंच्या संख्येत अकोल्यात डाळ उद्योग सुरू असून दिल्ली, कोलकाता, राजस्थान, हैद्राबाद, यासह नागपूर आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातून अकोल्यातील डाळींना मागणी वाढली आहे. राज्याबाहेरील अनेक व्यापाऱ्यांनी हजारो टन डाळीची बुंकिग अकोल्याच्या व्यापाऱ्यांकडे केल्याची माहिती आहे. एकीकडे वऱ्हाडात शेतकऱ्यांच्या तुरीला योग्य भाव आणि खरेदीदार नाही. नाफेडच्या खरेदी धोरणातील दिरंगाईमुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तूर घेऊन शेकडो शेतकरी माल विक्रीसाठी रांगेत लागले आहे. तर दुसरीकडे दिल्ली, राजस्थान आणि गुजरात राज्यातून अकोल्यातील तूर डाळीला प्रचंड मागणी वाढली आहे. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमधून दररोज हजारो टन डाळ देशभरात पाठविली जात आहे. विशेष म्हणजे देशासह अकोल्यातील डाळीला विदेशातही मोठी मागणी कायम असते. मध्यंतरी तुरीच्या इतर डाळींचे दर वधारल्याने सर्वसामान्य जनतेची ओरड सुरू झाली होती. त्यामुळे केंद्र शासनाने विदेशातून मोठ्या प्रमाणात डाळ आयात केली. त्यावरील इम्पोर्ट ड्युटीही लावली नाही. बाहेरून आलेला डाळीचा साठा आणि निसर्गाच्या कृपेने आलेले चांगले पीक यामुळे डाळीचे उत्पादन चांगले झाले. त्यामुळे तुरीला चांगले भाव मिळेल ही अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरली आहे. अकोल्यातील डाळ देशभरात जाते. त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्वाचाआहे, मात्र शासनाच्या काही धोरणांमुळे कधीकाळी तीनशेच्या वर डाळ प्रक्रिया उद्योग असणाऱ्या अकोल्यात आता केवळ १४० डाळ उद्योग शिल्लक राहिले आहे.- मधू चांडक, माजी उपाध्यक्ष, अकोला दाल मिल असोसिएशन.डाळीच्या निर्यातीवरील बंदी केंद्राने उठविली तर शेतकऱ्यांच्या तुरीला चांगला भाव मिळेल. सोबतच डाळ प्रक्रिया उद्योगही तेजीत येईल. शासनाच्या या धोरणामुळे महागाई आटोक्यात तर येणार नाही. उलटपक्षी शेतकऱ्यांचे आणि उद्योजकांचे नुकसान होईल.- वसंत बाछुका, विदर्भ चेबर्स आॅफ कॉमर्सचे सदस्य, अकोला.
अकोल्यातील डाळींना देशभरातून मागणी
By admin | Published: April 15, 2017 12:06 AM