अकोला : कृषिप्रधान देशात शेतक-यांनाच शासनाविरुद्ध झगडावे लागत आहे. शेतक-यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी आंदोलनाची दिशा आता अकोल्यात सोमवारपासून सुरू होणा-या आंदोलनाने ठरणार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी येथे केले.शेतकरी जागर मंचच्यावतीने रविवारी येथे स्वराज्य भवनात कापूस, सोयाबीन, धान (कासोधा) परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जगदिश मुरूमकार पाटील होते. सिन्हा म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सत्तेवर येऊन साडेतीन वर्ष पूर्ण होत आले, तरी शेतकºयांवरील अन्याय दूर झालेला नाही. उलट शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहेत. शेतमालाला भाव मिळण्यासाठी लढावे लागत आहे. जात, धर्म बाजूला ठेवून आता एकदिलाने, एकजुटीने ‘शेतकरी’ हीच जात आणि धर्म मानून शासनविरोधात लढाईसाठी सज्ज व्हावे. सोमवारपासून शेतकºयांसाठी अकोल्यातून आंदोलन सुरू होईल. हे आंदोलन देशभरातील शेतकºयांना दिशा देणारे असेल.मला आता कोणतेही राजकारण करायचे नाही किंवा अकोल्यातून मला लोकसभेची निवडणुकही लढवायची नाही. शेतकºयांसाठी जीवन अर्पण करण्याचे ठरविले असून त्यांच्यासाठी आता छातीवर वार झेलावे लागले तरी मागे हटणार नाही. शेतकºयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. देशभरातील शेतकºयांना आरसा दाखविण्याचे काम अकोल्यातून करायचे आहे, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आदींची उपस्थिती होती.
देशात शेतकरी आंदोलनाची दिशा अकोल्यातून ठरणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 4:31 AM