लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १ ते १० जून या कालावधीत १७४१ वाहनांवर लेन कटिंग केल्याबद्दल कारवाई करीत महामार्ग पोलिसांनी एक लाख ७४ हजार २०० रुपये दंड वसूल केला. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १७२ वाहनांवर दोन दिवसांत स्पीडगनद्वारे कारवाई करीत ३४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.वाढते अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी १५ एप्रिलपासून द्रुतगती मार्गावर विशेष कारवाई पथके तैनात केली आहेत. ही पथके वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून लेनच्या शिस्तीचा भंग करणाऱ्या वाहनांचे छायाचित्रण करून माहिती टोलनाक्यावरील पथकाला कळविते. त्या ठिकाणी दंडवसुली करण्यात येत आहे. ही कारवाई सुरू असतानाही वाहनचालक लेनच्या शिस्तीचा व वेगमर्यादेचा भंग करीत असल्याचे आढळून आल्याने सदर कारवाई मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. जूनच्या पहिल्या दहा दिवसांत उर्से टोलनाका, खालापूर टोलनाका व नवी मुंबई टोलनाका या ठिकाणी तसेच महामार्गावरील पळस्पे, बोरघाट व खंडाळा पोलीस टँब, तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांनी दहा दिवसांत १७४१ वाहनांवर लेनची शिस्त मोडल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. (वार्ताहर)> मागील दोन दिवसांपासून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १७२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. द्रुतगतीवरील अपघात रोखण्यासाठी मनाचा ब्रेक हाच उत्तम राहणार असल्याने प्रत्येक वाहनचालकाने वेगमर्यादेचे पालन करत लेनची शिस्त पाळावी. तसेच मार्गावरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लेन कटिंग करणाऱ्या १७४१ वाहनांवर कारवाई
By admin | Published: June 13, 2016 2:13 AM