- ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 22 - गेल्या काही महिन्यांपासून ऑर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या नाशिकमधील अलिशान फार्म हाऊसवर जप्तीची कारवाई करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (एसीबी) ही कारवाई केली आहे. एसीबीचं पथक भुजबळ फार्मवर दाखल झालं असून मोजमाप आणि व्हॉल्युएशनचं काम सुरु आहे अशी माहिती मिळाली आहे. मात्र ही जप्तीची कारवाई नसल्याचा दावा भुजबळ कुटुंबिय करत आहेत.
नाशिकमधील गोविंदनगर भागात भुजबळांचं फार्महाऊस आहे. फार्म हाऊसवर ईडीचं पथक दाखल झालं असून फार्मचं मोजमाप करण्याचं काम सुरु आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी भुजबळ व कुटुंबीयांच्या मुंबई, नाशिक व अहमदनगरमधील विविध २२ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईत नाशिकमधल्या आलिशान फार्म हाऊसवरही जप्ती आणण्यात आली . नाशिकमधील औद्योगिक जमीन, वायनरी प्रकल, द्राक्षांच्या बागा यांच्यासह भुजबळ फार्म हाऊसवरही कारवाई करण्यात आली.
भुजबळ फार्ममधील साडेतीन एकर जागा ही भुजबळांची वडिलोपार्जित जागा आहे, तर उर्वरित जागा त्यांनी नव्याने विकत घेऊन त्यावर आलिशान महाल उभा केला आहे. हा महाल व त्यांच्या कार्यालयाची जागा जप्त केली असून हे बेहिशेबी पैशांतून बांधल्याचा ईडीचा आरोप आहे. भुजबळांचा नाशिकमधील एकमेव निवाराही जप्त झाल्याने भुजबळ नाशिकमधून बेघर झाल्याची चर्चा आहे.
ईडीने केलेल्या कारवाईमधील मालमत्तांची एकूण किंमत सुमारे ९० कोटी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अशा प्रकारे आत्तापर्यंत ‘ईडी’ने जप्त केलेल्या भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तांचे मूल्य आता ४३३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. माजी मंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून ऑर्थर रोड कारागृहात आहेत. या प्रकरणी भुजबळांचे पुत्र व राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांना उच्च न्यायालयाने नुकताच अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी विविध कंपन्यांच्या संगनमताने आर्थिक गैरव्यवहार करत कोट्यवधींची मालमत्ता गोळा केल्याचा ‘ईडी’ने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा, मुंबईतील कलिनातील भूखंड घोटाळ्यातून हा अपहार केल्याचा ईडीचा दावा आहे.
सक्तवसुली संचालनालयाने ३० मार्चला न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये भुजबळ पिता पुत्र व पुतण्याशिवाय, डीबी रिअॅलिटी, बलवा ग्रुप, नील कमल रिअॅलटर्स अँड बिल्डर्स, नीलकमल सेंट्रल अपार्टमेंट, एलएलपी आणि काकडे इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपन्यांचा समावेश आहे.
भुजबळ साडेसहा महिने कोठडीत
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भुजबळ कुटुंबियांच्या पाठीमागे कारवाईचा ससेमिरा लागला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व ईडीने मनी लॉन्ड्रिंग, महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणाचा तपास शिताफीने केला. यावर्षीच्या सुरवातीला पहिल्यांदा समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्यानंतर छगन भुजबळ यांनाही अटक झाली. गेल्या साडेसहा महिन्यांपासून ते कोठडीत आहेत.