मुंबई – दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्यात राजकीय फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले. १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना ईडीने अटक केली आहे. देशमुखांच्या अटकेला काही तास उलटत नाही तोवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कारवाई करण्यात आली. आयकर विभागाने अजित पवारांच्या ५ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.
अनिल देशमुख(Anil Deshmukh) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावरील कारवाईनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, उशीरा का होईना न्याय मिळाला अशी राज्यातील जनतेची भावना असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील कारवाईनंतर राज्यातील १० मंत्री त्यांच्याकडे सॉलिसिटरच्या ऑफिसमध्ये गेले असतील असा दावा. १० नेत्यांनी मनी लॉन्ड्रिंग केले आहे. भ्रष्टाचाराचा पैसा बेनामी असतो, रोकड असते. तो किती दिवस ठेवायचा. हवालाच्या माध्यमातून या पैशाची गुंतवणूक होती. काळ्याचा पांढरा करुन गुंतवणूक केली जाते. या १० नेत्यांची अवस्था बिकट होणार आहे असा दावा सोमय्यांनी केला.
त्याचसोबत १० नेत्यांच्या घरावर आयकर विभाग, ईडी धाड टाकण्याची शक्यता आहे. सध्या कारवाई सुरु झाली आहे. अनिल देशमुख, अजित पवार यांच्यावर कारवाई झाली आहे. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर अजित पवारांवरील कारवाई थांबवून दाखवावी. कुटुंबीयांच्या नावाने बेनामी संपत्ती गोळा केली जातेय. आकडे पुरावे दिले आहेत. डिसेंबरपूर्वी अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार हे ५ नेते गॅरंटी देऊन सांगतोय यांच्याविरोधात चौकशी सुरू झालीच आहे. अलीबाबा आणि ४० चोर असं ठाकरे सरकार आहे. नवीन वर्षाची पहाट भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने जाईल असंही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
अजित पवारांच्या खालील संपत्तीवर जप्तीचे आदेश
जरंडेश्वर साखर कारखाना – अंदाजित किंमत ६०० कोटी
दक्षिण दिल्लीतील फ्लॅट – २० कोटी
पार्थ पवार निर्मल ऑफिस – २५ कोटी
निलय नावाचं गोव्यातील रिसोर्ट – २५० कोटी
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या जमिनी – जवळपास ५०० कोटी
१३ तासांच्या चौकशीनंतर अखेर अनिल देशमुखांना ED कडून अटक
गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी ईडीसमोर हजर झाले. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. यानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुख यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात होते.