मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्राबाबत कोणी पाकिस्तान आणि अन्य काही उल्लेख करील तर त्याच्याशी आम्ही बिलकुल सहमत नाही. मात्र, कंगणा रानौतचे बांधकाम अनधिकृत होते तर एक महिन्यांपूर्वी, एक वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने का कारवाई केली नाही? असा सवाल करत पालिका आणि राज्य सरकारने आजची केलेली कारवाई ही सूड बुद्धीने केलेली कारवाई आहे, असे भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
आमच्या बरोबर याल तर वाचवू आणि आमच्या विरोधात गेलात तर घरात घुसून ठोकून काढू, असे ठोकशाहीचे वर्तन राज्यातील ठाकरे सरकारचे आहे. हे आज दिसून आले, असेही आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच सामनातून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, "बात हरामखोरीची निघाली तर मग 'डांबराने' लिहिले जाईल, असे मुंबईकरांना बरेच आठवेल. 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतंय? बेईमानी नेमकी कोण करतंय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पाहा!"
याचरोबर, मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवली होती का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. तसेच, रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरात आणि कंगना राणौतच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना? असेही सवाल आशिष शेलार यांनी पालिकेवर निशाणा साधला.
याशिवाय, कर्तबगार मुंबई पोलिसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला 'बिर्याणी' घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची 'बिर्याणी' खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.
कार्यालयावर कारवाई सुरू होताच कंगनाचा हल्लाबोलआज सकाळी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं कारवाई सुरू करताच कंगनाने शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. कंगनाने एका ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली. 'मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचे नाव अयोध्या होते. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडले जाते आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारले जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,' असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले.
पालिकेच्या कारवाईला न्यायालयाकडून स्थगितीकंगना राणौतच्या कार्यालयात मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे कंगनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती.
कंगनाच्या कार्यालयात नेमकं काय अनधिकृत?तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन, स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला, दुसर्या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली.
महापालिकेने बजावली होती नोटीस कंगनाच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस लावली. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत २४ तास होती. कंगनानं कार्यालयात बांधकाम करताना मुंबई महापालिकेच्या अधिनियम ३५४ अ चं उल्लंघन केल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या नोटिशीत सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार झालेलं नाही. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालयं दाखवण्यात आलं होतं. कागदपत्रांत शौचालयं दाखवण्यात आलेली जागा प्रत्यक्षात मात्र ये-जा करण्यासाठी वापरण्यात आली आहे, असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे.
आणखी बातम्या...
- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका
- जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, महबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर निशाणा
- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"
- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती
- मोदी सरकार IRCTC मधील हिस्सा विकण्याच्या तयारीत, दोन दिवसांत शेअर ७ टक्क्यांनी घसरला