नांदेड- पंजाब नॅशनल बँकेसह इतर काही बँकांना 12 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या घोटाळ्याच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच कार्ती चिदंबरम यांना अटक केली असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम गेल्या चार वर्षांपासून सातत्याने शासनाच्या जनविरोधी धोरणाविरोधात बोलत आहेत. त्यांनी सरकारचे अपयश आणि घोटाळे जनतेसमोर मांडले म्हणून राजकीय सूडबुद्धीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट करून त्रास देण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या या अशा सूडबुद्धीच्या कारवाईला घाबरत नसून या सरकारची गैरकृत्य व घोटाळे उघड करून जनतेसमोर सत्य मांडण्याचे आपले काम करत राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
गेल्या काही तासांपूर्वीच माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली होती. सीबीआयने चेन्नई विमानतळावर अटकेची कारवाई केली. कार्ती चिदंबरम लंडनहून परतत असताना त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. आयएनएक्स मीडिया प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंगप्रकरणी सुरू असलेल्या तपासात कार्ती चिदंबरम सहकार्य करत नसल्याचा सीबीआयचा आरोप आहे.