पुणे – राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई केली गेली आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना यातना देण्याचा प्रयत्न जाणुनबुजून केला जातोय. मात्र याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष करणार असल्याची स्पष्ट भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना मांडली. नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचंही पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले की, गेली २० वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. त्या सर्व काळात कधी असे चित्र दिसले नाही मात्र आताच दिसले. एखादा मुस्लिम कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा जोडीदार बोलायचं. कारण नसताना हा आरोप केला जातोय. मला याची चिंता नाही कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक यापद्धतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्याची चिंता करण्याचे कारण नाही असा टोलाही पवारांनी भाजपाचं(BJP) नाव न घेता लगावला.
दरम्यान, नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढा असा आग्रह भाजपा करतेय. परंतु त्यांना अटक झाली म्हणून का काढा? कबूल आहे त्यांना अटक झाली परंतु सिंधुदुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा वाचण्यात आले नाही. एक न्याय नारायण राणे यांना लावता आणि दुसरा न्याय नवाब मलिक यांना लावता याचा अर्थ हे सगळं राजकीय हेतूने केलं जातंय. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) पुण्यात येत आहेत. उद्या कदाचित त्याचा खुलासा करतील असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
उद्धाटनासोबत यूक्रेनमधील विद्यार्थ्यांना सोडवणंही अधिक महत्त्वाचं
पुण्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प येत असून उदघाटनाचे कार्यक्रमही होत आहेत. या महत्त्वाच्या कार्यक्रमासोबतच युक्रेनमधील मुलांची सोडवणूक करणेही अधिक महत्त्वाचे आहे, असे सांगतानाच देशाची सुत्रे ज्यांच्याकडे आहेत, ते याची गांभीर्याने दखल घेतात का? हा महत्वाचा सवाल आहे असं सांगत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं.
पवार म्हणाले की, आज रशिया व युक्रेन युद्धाच्या संकटात कुणी काय केले किंवा काय केले नाही. याची चर्चा करण्याची ही वेळ नाही. या मुलांना संकटातून कसे वाचवता येईल याकडे सत्ताधारी घटकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवं. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा देशात आणण्यासाठी भारत सरकार आणि दुतावासाने काही प्रयत्न केले आहेत. पण काल माझ्याशी रशियाच्या सीमेपासून पाच तासांवर असलेल्या विद्यार्थ्यांनी फोनवरुन संवाद साधला त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांशीही माझे बोलणे झाले आहे. केंद्र सरकार या मुलांना परत आणण्यासाठी जे जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही अजून विद्यार्थी तेथे आहेत. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर युक्रेनच्या सीमेबाहेर येता येईल असा प्रयत्न करा असे भारतीय दुतावासाकडून त्यांना सांगितले जात आहे.