नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातील सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी अखेर नीरा पोलिसांनी मोहीम हाती घेऊन वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. नीरेतील प्रामुख्याने पालखी मार्गावर वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून दंड वसूल केला जात आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नीरा पोलिसांनी कित्येक महिन्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केला आहे. रोडरोमिओ दुचाकी चालकांनादेखील कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.नीरा शहरातील पालखी मार्ग, बारामती मार्ग, बाजारतळ परिसरात वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी अखेर जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा दूरक्षेत्राचे नूतन पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस हवालदार सुदर्शन होळकर, सुरेश गायकवाड यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. नीरा दूरक्षेत्रात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याकडे नेहमीच काणाडोळा केला जात आहे.कर्मचाऱ्यांच्या अभावी स्थानिक पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांना दिवसरात्र नीरा दूरक्षेत्राची सूत्रे सांभाळावी लागत आहेत. सध्या वाहतूक आणि रात्रगस्तीसाठी पोलीसमित्र तरुणांची साथ घेऊन पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले दूरक्षेत्राचा कार्यभार सांभाळत आहेत. पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी प्राधान्याने नीरा शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम उघडली असून, त्यांनी सुरू केलेल्या कारवाईचा वाहनचालकांनी धसका घेतला आहे. शिवाजी चौक ते नीरा नदी पुलापर्यंतच्या पालखी मार्गावर आणि बाजारतळ परिसरात कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होवून वाहतूक सुरळीत होणार आहे. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांना आळा बसण्यास मदत होणार आहे. या वाहतूकीचा पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता.(वार्ताहर)>सार्वजनिक बांधकाम खाते, नीरा ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. बाजारतळ परिसरात आठवडा बाजारादिवशी वाहतुकीची कोंडी करणाऱ्या वाहनांवर आणि वाहतुकीस अडथळा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पालखी मार्गाबरोबर बारामती मार्गावरदेखील बेशिस्तपणे वाहनाचे पार्किंग करून बाहेरगावी फिरायला जाणाऱ्या वाहनमालकांची संख्या घटली असली तरी काही गर्दीच्या ठिकाणी अजूनही बेशिस्तपणे वाहने पार्किंग केले जात आहे. येत्या काही दिवसांत महाविद्यालये पुन्हा सुरू होणार असल्याने रोडरोमिओंवर कारवाईची मोहीम उघडण्यात येईल. एका दुचाकीवरून तीन जण बसून फिरणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी सांगितले.>पालखी मार्गावरच बेशिस्तनीरा बसस्थानकासमोर पालखी मार्गालगत बेकरी, चहा, वडापाव, रसवंतीगृह, फळविक्री व्यवसायाची दुकाने असल्याने ग्राहकांची वाहने पालखी मार्गावरच बेशिस्तपणे पार्किंग केली जातात. या परिसरातदेखील वाहनचालकांवर कारवाई करण्याची अनेक दिवसांपासून मागणी आहे. बसस्थानकासमोरील परिसरात नो पार्किंग झोन असतानादेखील सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीकडे पोलिसांचे नेहमीच दुर्लक्ष आहे.
बेशिस्त वाहतुकीविरोधात कारवाई
By admin | Published: June 11, 2016 1:28 AM