हितेन नाईक -पालघर : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदार यांच्या गाड्यांचा ताफा सोमवारी रात्री १०.३०- ११.०० च्या सुमारास तलासरी चेक पोस्टपर्यंत पोहोचल्यानंतर गुजरातपोलिसांच्या आलेल्या ताफ्यासोबत एकनाथ शिंदेगुजरातकडे रवाना झाले होते. या घटनाक्रमात पालघर पोलीस अधीक्षक उपस्थित असल्याने नाकाबंदीच्या नावाखाली पालघर जिल्ह्यातील पोलीस विभागाने गुजरातचा मार्ग एकनाथ शिंदेंना सुलभ बनवून दिल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिंदेंना मदत करणाऱ्या अधीक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे विधानभवनातून बाहेर पडले. आपल्या समर्थक आमदारांना दिलेल्या सूचनांप्रमाणे तसेच योजना ठरविल्याप्रमाणे रात्री उशिरा या बंडखोरांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. बाळासाहेब पाटील हे पालघरला बदली होण्यापूर्वी ठाणे वाहतूक शाखेमध्ये उपायुक्त पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना पालघर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बदली करून आणण्यात आले. पालघरचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांना ठाणे येथे बदली करून पाठविण्यात आले. यामागे शिंदे यांचाच हस्तक्षेप असून काही महिन्यांपूर्वी तत्कालीन अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांची गृह विभागाने केलेली बदली शिंदे यांनी थांबवली होती. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा प्रवास विनाअडथळा गुजरातच्या दिशेने पार पडावा यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत आच्छाड चेकपोस्टवर नाकाबंदी ठेवल्यामुळे याला दुजोरा मिळत आहे. दरम्यान, या घटनेबाबत पालघर पोलिसांकडे अधिक चौकशी केली असता जिल्ह्यात सोमवारी रात्री अचानक नाकाबंदी जाहीर करण्यात आली होती, त्याप्रमाणे सर्व अधिकारी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी गस्त घालत होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक हेदेखील नाकाबंदीच्या गस्ती वर फिरत होते, असे सांगण्यात आले.
नाट्याबाबत सत्ताधाऱ्यांना उशिरा जागशिंदे व अन्य सर्व आमदार हे त्यांना राज्यातील पोलिसांचे संरक्षण असताना परराज्यात जात असताना गुप्त विभागाला याची माहिती मिळाली नाही असे होऊ शकत नाही. बंडखोरीच्या या नाट्याबाबत सत्ताधारी पक्षाला आता उशिरा जाग आली असून त्यामुळे आता पोलिसांच्या चौकशा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शिंदेंना मदत करणाऱ्या पालघरच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यावरही कारवाई होते की नाही, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.