मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोडे मारणे, या घटनेवरून सभागृहात झालेल्या गदारोळात झालेली घोषणाबाजी हे सगळे तपासून आपण शनिवारी सभागृहात निर्णय देऊ,असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
अध्यक्ष संबंधित आमदारांवर निलंबनाची कारवाई करतात की त्यांना समज देतात याकडे आता लक्ष असेल. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. या निमित्ताने विधानभवन परिसरातील आमदारांच्या वर्तणुकीचा मुद्दाही ऐरणीवर आला.
तीनवेळा सभागृह गदारोळात तहकूब झाल्यानंतर अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की विधान भवनाच्या आवारात काल जी घटना घडली ती अत्यंत चुकीची होती, याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. त्याचप्रमाणे आज सभागृहात काही सदस्यांकडून पंतप्रधानांबाबत जे वक्तव्य करण्यात आले तेही चुकीचे असून तेदेखील अशोभनीय आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कामकाज मंत्री आणि इतर दोन्ही बाजूंच्या सदस्यांसोबत माझी चर्चा झाली आहे.
सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील माहिती मी तपासून घेणार आहे. त्यानंतर उद्या यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेईन.