लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मापात पाप करून ग्राहकांची लूटमार करणाऱ्या औरंगाबाद येथील दोन आणि ठाण्याच्या भिवंडीतील एक अशा आणखी तीन पेट्रोल पंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. यात गेल्या दोन दिवसांमध्ये सात कर्मचाऱ्यांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.राज्यभरात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेगवेगळ्या पथकांकडून गेल्या एक आठवड्यापासून कारवाईचे हे सत्र सुरूच आहे. सहायक आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबदच्या सिडकोतील भवानी आॅटो आणि गजानन महाराज चौकातील गजानन आॅटो या दोन पेट्रोल पंपांवर पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने शनिवारी आणि रविवारी तपासणी केली. या तपासणीत पेट्रोल पंपचालकांचे पितळ उघडे पडले. दुसरी कारवाई ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या चाविंद्र परिसरातील आर. के. पेट्रोल पंपावर वरीष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या पथकाने केली. औरंगाबाद येथील दोन पंपावरील दोन युनिट सील करण्यात आले असून, भिवंडीत पंपावरील पेट्रोल तपासणीसाठी घेण्यात आले आहे. तो पंप मात्र सील केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत ४१ पंपांवर कारवाई झाली असून, शनिवारी सहा तर रविवारी एक अशा सात तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना २८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
औरंगाबाद-भिवंडीच्या पेट्रोलपंपांवर कारवाई
By admin | Published: June 26, 2017 2:37 AM