पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिफेक्टरी येथे आंदोलनाचे पोस्टर लावण्यावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली़ त्यात ५ जण जखमी झाले आहेत़ याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोन्ही संघटनेच्या ४ -४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे़याबाबत मिळालेली माहिती अशी, एसएफआयचे कार्यकर्ते त्यांच्या आंदोलनाची माहिती देणारे पोस्टर विद्यापीठातील रिफेक्टरी येथे शुक्रवारी रात्री लावत होते़ त्याला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली़ त्यावरुन त्यांच्यात वाद होऊन प्रकरण मारामारीवर गेले़भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकालाही त्यांनी मारहाण केली़ ही माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी गेले़ त्यानंतर दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते परस्परांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुणे विद्यापीठ चौकीत जमा झाले होते़याबाबत पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही संघटनेच्या चार-चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे़ त्यांच्या तक्रारी घेण्याचे काम सुरू आहे़ (प्रतिनिधी)
अभविप, एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
By admin | Published: February 25, 2017 2:28 AM