ठाणे : अमेरिकन तपास यंत्रणेचे (एफबीआय) सिनिअर अधिकारी सुहेल दाऊद यांनी शुक्रवारी ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन मीरा रोड येथील कॉल सेंटरमधून अमेरिकन व अनिवासी भारतीयांच्या झालेल्या फसवणुकीबाबत माहितीची देवाणघेवाण केली. ठाण्यात ज्याप्रमाणे पोलिसांनी कॉल सेंटरप्रकरणी अटक केली, त्याप्रमाणे अमेरिकेतही काही लोकांना अमेरिकन पोलिसांनी अटक केल्याची माहिती अमेरिकन यंत्रणेने ठाणे पोलिसांना दिली. तसेच या फसवणुकीचे दुबई कनेक्शन असल्याचेही या वेळी पुढे आले आहे. या प्रकरणी ४ ते ५ मुख्य आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यातील शागी उर्फ सागर ठक्कर हा आरोपी सध्या भारतात नसल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सुहेल आणि आयुक्तांची तब्बल १ तास या प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना आयुक्तांनी अमेरिकेत आणि ठाण्यात अशा प्रकारे कॉल सेंटर माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे सांगितले. त्यांच्याकडेदेखील मोठ्या प्रमाणात पुरावे आहेत. त्याप्रमाणे आमच्याकडे पुरावे आणि कॉल रेकॉर्ड असल्याची माहिती देवाणघेवाणीत शेअर केल्याचे आयुक्त म्हणाले. तसेच अमेरिकेतील महिलेचा भारतातून केलेल्या कॉलमुळे मृत्यू झाला आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, चौकशीत ही बाब लवकरच समोर येईल. त्यानंतर, त्यासंदर्भातही गुन्हा दाखल केला जाईल. पण, तो कोणत्या प्रकारे दाखल होईल, हे मात्र आयुक्तांनी स्पष्ट के ले नाही. (प्रतिनिधी)
कॉल सेंटरप्रकरणी अमेरिकेतही कारवाई
By admin | Published: October 15, 2016 4:38 AM