मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा विकास करणाऱ्या विकासकाला साडे पाच कोटी रुपये खर्चून रस्त्याची दुरुस्ती करायला लावू तसेच इंदापूर-आगरदांडा आणि माणगाव-दिघी पोर्ट या रस्त्याचे ६२० कोटी रुपये खर्च करून दुपदरीकरण करण्याच्या कामाचा करार करण्यास भाग पाडले जाईल. हे काम पूर्ण करण्याचे टप्पे ठरवून विकासकाकडून काम करून घेतले जाईल. त्यामध्ये त्याने कुचराई केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिला.सुनील तटकरे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. बुधवारी ही लक्षवेधी चर्चेला आली तेव्हा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. मात्र हा विषय बंदरविकास खात्याशी संबंधित असल्याने मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, असा आग्रह तटकरे यांनी धरला. अखेरीस लक्षवेधी राखून ठेवण्याचे निर्देश तालिका सभापती प्रकाश बिनसाळे यांनी दिले होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिघी बंदराकडे वाहतूक करणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता ५५ कोटी रुपये विकासकाने देण्याचा निर्णय झाला होता. मात्र याच रस्त्यावरून अन्य वाहतूक होत असल्याने दुरुस्तीवर विकासकाने साडे पाच कोटी रुपये खर्च करावे, असे ठरले होते. (विशेष प्रतिनिधी)
दिघी बंदराच्या विकासकावर कारवाईचा इशारा
By admin | Published: April 10, 2015 4:14 AM