मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात रिक्षा-टॅक्सींसह खासगी बसमधून अवैध प्रवासी वाहतुक होते. मात्र त्यावर कठोर कारवाई होताना दिसत नाही. आता ही वाहने परिवहन विभाग आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या रडारवर असतील. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने आदेशच काढले असून त्याबाबतची एक प्रत मुंबई वाहतुक पोलिसांनाही पाठवली आहे. लवकरच कारवाईला सुरुवात होईल, अशी माहिती देण्यात आली. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियमांमधील विविध शुल्कांमध्ये २९ डिसेंबर २0१६ पासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नुकतीच शुल्कात पुन्हा वाढ करण्यात आल्याने आॅटोरिक्षा व टॅक्सी चालक मालकांवर हा अन्याय करणारा निर्णय आहे. ही वाढ रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी लागू करु नये या मागणीसह अन्य काही महत्वाच्या मागण्यांसाठी शुक्रवारी मुंबई आॅटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनकडून परिवहन आयुक्त प्रविण गेडाम यांची भेट घेतली. यावर तोडगा काढू असे आश्वासन त्यांच्याकडून युनियनला देण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे या मागणीबरोबरच अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर निर्बंध आणावेत, अशी मागणीही युनियनकडून करण्यात आली. या वाहतुकीमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर गदा येत असल्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. ही मागणी विचारात घेऊन अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याचे आश्वासन परिवहन आयुक्त गेडाम यांनी दिले व त्यानंतर तात्काळ कारवाईचे आदेशच काढले. यासंदर्भात प्रविण गेडाम यांना विचारले असता, कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यासंदर्भात मुंबई वाहतूक पोलिसांनाही कारवाई करण्याची मागणी केली आहे व तशी आमच्या आदेशाची प्रतही दिली आहे. सध्या परिवहन विभागाकडे अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आठ पथके आहेत. मुंबईतील अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आठपैकी दोन पथके ही मुंबईत कारवाईसाठी वापरु. लवकरच या कारवाईला सुरुवात होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई
By admin | Published: January 14, 2017 5:18 AM