मुंबई : लोकलमध्ये अपंगांच्या आरक्षित डब्यात अन्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. त्याचा त्रास अपंग प्रवाशांना होत असल्याने घुसखोर प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आरपीएफने (रेल्वे सुरक्षा दल) विशेष संवेदना पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून ९ एप्रिल ते २९ एप्रिलदरम्यान तब्बल सहा हजार घुसखोर प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.लोकलमधून अपंगांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र डबा आरक्षित ठेवण्यात आला आहे. असे असूनही अन्य प्रवाशांकडून अपंगांच्या डब्यात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली जाते. यामुळे प्रवास करताना अपंगांना मोठा त्रास तर होतोच तसेच वादही उद्भवतात. ही अन्य प्रवाशांची घुसखोरी थांबविण्यात यावी, अशी मागणी अपंग प्रवाशांकडून वारंवार रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली. त्याची दखल मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली असून, आरपीएफच्या साहाय्याने ‘संवेदना’ पथक स्थापन करण्यात आले आहे. अशी एकूण आठ पथके असून, त्यामध्ये पाच ते सहा पोलीस आणि टीसींचा समावेश आहे. हे पथक ८ एप्रिल रोजी स्थापन केल्यानंतर ९ एप्रिलपासून मध्य रेल्वेच्या काही गर्दीच्या स्थानकांवर अपंगांच्या डब्यातील घुसखोर प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. २९ एप्रिलपर्यंत करण्यात आलेल्या या कारवाईत संवेदना पथकाकडून ६ हजार १२४ प्रवाशांना पकडण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर टीसींकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, १९ लाख ३४ हजार ७२८ रुपये दंड वसूल केला, तर न्यायालयाकडूनही स्वतंत्रपणे दंड आकारण्यात आला असून, ४,७00 दंड वसूल केल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
घुसखोर प्रवाशांवर कारवाई
By admin | Published: May 02, 2015 1:42 AM