मुंबई : शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा शेतकऱ्याकडून कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या संस्थांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. गरज पडल्यास दूध संघांकडील अतिरिक्त दुधाची गुणवत्ता तपासून राज्य शासन ते खरेदी करेल, अशी माहिती पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे दिली.राज्यातील दुधाच्या खरेदीचे दर कमी असून शेतकरी अडचणीत असल्याबाबतचा प्रश्न विधानपरषिदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नागपूर अधिवेशन काळात विचारला होता. त्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समिती सभागृहात मंगळवारी बैठक घेण्यात आली. बैठकीस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.खडसे म्हणाले, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळे राज्य शासनाने ठरवून दिलेल्या वीस रुपये प्रतिलिटर या दरापेक्षा कमी दराने दूध संस्था शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत असतील तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. यासंदर्भातला अध्यादेश काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल.कमी दराने दूध खरेदी करुन ते ग्राहकांना जास्त दराने विकून नफा मिळविणाऱ्या दूध संस्थांनी शेतकऱ्याला मदत व्हावी यासाठी खरेदीचे दर वाढविणे आवश्यक आहे. दूध संघांकडील अतिरिक्त दूध शासन नाकारणार नाही, पण त्याची गुणवत्ता तपासून अतिरिक्त दूध खरेदी केले जाईल. दुधात भेसळ करण्याचे प्रकार सुरु असतील तेथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून छापे टाकून धडक कारवाई हाती घेण्यात येईल, असेही यावेळी ठरले. (विशेष प्रतिनधी)च्विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दूग्धमंत्री खडसे यांना पत्र दिले. त्यात ते म्हणतात, दुधाच्या खरेदी आणि विक्रीदरात असमतोलाची परिस्थिती निर्माण झाली आहे. च्शासन निर्धारित किंमतीपेक्षा कमी दराने दूध खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्याही हितासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.
‘कमी दराने दूध खरेदी करणाऱ्यांवर कारवाई’
By admin | Published: May 20, 2015 1:59 AM