अमित सोमवंशी / सोलापूरचिंचोली औद्योगिक वसाहतीमधील एव्हॉन लाइफ सायन्सेन लि. कंपनीत सापडलेल्या इफेड्रीनच्या अवैध साठ्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अन्न औषध प्रशासनाचे सात अधिकारी दोषी आढळले आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई कुणी करायची यावरून अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलिसांत टोलवाटोलवी सुरू आहे.एफडीएचे सहआयुक्त बैजल यांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. यावर पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी एफडीए आयुक्ताना पत्र पाठवून ‘तुमच्या स्तरावरून कारवाई करावी, असे कळविले आहे. सं. मा. साक्रीकर, भा. द. कदम, वि. रा. रवी, म. स. जवंजाळ पाटील, बा. रे. मासाळ, सं. ता. पाटील, नियंत्रण प्राधिकारी ओ. शो. साधवानी हे सात अधिकारी कारवाईस पात्र असल्याचे सहआयुक्त (दक्षता) अन्न व औषध प्रशासन हरीश बैजल यांनी म्हटले आहे. इफेड्रीन तस्करीप्रकरणी कंपनीचा संचालक मनोज जैनसह चार जणांविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोलापूर न्यायालयात ४८७ पानांचे दोषरोपपत्र मागील महिन्यांत दाखल केले आहे. कंपनीच्या साठ्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या एफडीएच्या सातही अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप न केल्याने या कंपनीला इफेड्रीनमध्ये गैरव्यवहार करण्यास मोकळीक मिळाली आहे.
कारवाईस चालढकल
By admin | Published: November 15, 2016 5:48 AM