मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत २३ निष्पाप जिवांचा बळी गेला आणि मुंबई हादरली. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत, पंधरा दिवसांत रेल्वे पूल आणि परिसरातले फेरीवाले प्रशासनाने हटविले नाहीत, तर मनसे आपल्या पद्धतीने काम करेल, असा इशारा दिला. मनसेच्या इशाºयाला पंधरा दिवस पूर्ण होताच, शनिवारी मनसेने ठाण्यात आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांचा समाचार घेतला. दुसरीकडे मुंबईत मात्र, महापालिका आणि रेल्वे प्रशासन जागरूक असल्याने मनसे आंदोलनापूर्वीच दादर, कुर्ला आणि अंधेरी येथील पुलासह परिसरात फेरीवाले शनिवारी गायब असल्याचे चित्र होते.मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, मुंबईतील सर्वाधिक गर्दी दादर येथे असते. एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर महापालिकेने ठिकठिकाणांवरील फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र, मागील काही दिवसांपासून दादरसह तुरळक ठिकाणी फेरीवाले नजरेस पडत होते. शनिवारी मात्र दादर रेल्वे स्थानकाचा पादचारी पूल, स्वामी नारायण मंदिराचा परिसर, कैलास लस्सी परिसर, मामा काणे हॉटेल रस्ता, फूलमार्केटसह लगतचा परिसर पूर्णत: रिकामा होता. सुविधा शोरूमसह येथील पोलीस ठाण्यालगत फेरीवाल्यांवर कारवाई करणारे महापालिकेचे वाहन दिवसभर तैनात होते. परिणामी, वरीलपैकी कुठेही फेरीवाल्यांनी ठाण मांडले नव्हते.अंधेरीचा विचार करता, पूर्वेच्या तुलनेत पश्चिमेला फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. मात्र, शनिवारी येथेही फेरीवाले गायब होते. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेच्या तुलनेत पश्चिमेकडील फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. पश्चिमेला तिकीट घरापासून न्यू मिल रोडपर्यंत आणि गणपती मंदिरापासून पोलीस चौकीपर्यंत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलेला असतो. शनिवारी मात्र, यापैकी कोणत्याच परिसरात फेरीवाले नव्हते. परिणामी, दादर, अंधरी आणि कुर्ला येथील परिसर शनिवारी ‘विनाफेरीवाला क्षेत्र’ असल्यासारखा जाणवत होता.पालिकेच्या वाहनांची करडी नजरमहापालिका आणि रेल्वे प्रशासन जागरूक असल्याने, मागील काही दिवसांपासूनच दादरसह मोक्याच्या ठिकाणांवर फेरीवाले बसत नव्हते. दादर, घाटकोपर, अंधेरी, कुर्ला या मोठ्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात महापालिकेचे वाहन तैनात असल्याने, परिसर ‘विनाफेरीवाला क्षेत्रा’सारखा दिसत होता. मुळातच दिवाळीदरम्यान सर्वत्रच गर्दी वाढत असताना, रेल्वे स्थानकांच्या परिसरात गायब झालेल्या फेरीवाल्यांमुळे पादचाºयांना दिलासा मिळाल्याचे चित्र होते. दरम्यान, शनिवारी फेरीवाले नसल्याने रिकामे झालेले हे परिसर भविष्यात असेच राहतात का? याकडे आता मुंबईकरांचे लक्ष आहे.
दादर, अंधेरीतील फेरीवाले गायब, मनसे आंदोलनापूर्वीच पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 6:18 AM