नवी मुंबई : वाहन पार्किंगसाठी रस्ते वापरणाऱ्या रहिवासी सोसायट्यांवर कारवाईचे संकेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. शुक्रवारी कोपरखैरणे येथे ‘वॉक विथ कमिशन’ या उपक्रमादरम्यान अधिकाधिक नागरिकांनी वाहतूक कोंडीच्या समस्या आयुक्तांपुढे मांडल्या. यावेळी त्यांनी भाडोत्री पार्किंग नाकारणाऱ्या घणसोलीतील सोसायटीवर कारवाईच्या सूचना करत पार्किंगसाठी रस्ते वापरणाऱ्या इतरही सोसायट्यांवर त्यांनी कारवाईचे आदेश दिले.थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने कोपरखैरणे येथे ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम राबवण्यात आला होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला. त्यामध्ये बहुतांश तक्रारी रहिवासी सोसायटीअंतर्गतच्या होत्या. त्याशिवाय उघड्या मैदानांसह रस्त्यालगत साचणाऱ्या कचऱ्यामुळे रोगराई पसरत असल्याच्याही तक्रारी नागरिकांनी केल्या. याचदरम्यान घणसोली येथील पंचवटी सोसायटीत भाडोत्रींच्या वाहन पार्किंगला जागा दिली जात नसल्याची तक्रार एका रहिवाशाने केली. पर्यायी भाडोत्री रहिवाशांना सोसायटीबाहेर रस्त्यालगत वाहने उभी करावी लागत असल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्या सोसायटीवर कारवाईच्या सूचना केल्या. तसेच ज्या रहिवासी सोसायट्यांमध्ये पार्किंगची सोय असतानाही रस्त्यावर वाहने उभी केली जातात अशा सोसायट्यांचा शोध घेवून त्यांच्यावरही कारवाईचे आदेश आयुक्त मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिले. घणसोली, कोपरखैरणे विभागात सद्यस्थितीला रस्त्यावर उभ्या होणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. सिडकोकडून नियोजनाचा अभाव असतानाच पार्किंगच्या जागेत झालेली अनधिकृत बांधकामे व चौकाचौकातील रिक्षांचे अवैध थांबे देखील वाहतूक कोंडीला तितकेच कारणीभूत ठरत आहेत. (प्रतिनिधी)>आयुक्तांच्या स्वागतासाठी सावरासावरआयुक्तांचा ‘वॉक विथ कमिशनर’ झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच रहदारीच्या मुख्य रस्त्यावर एका हॉटेल व्यावसायिकाने बेकायदा कब्जा मिळवलेला आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारात बांधलेल्या या हॉटेलसाठी जनरेटरची वीज वापरली जाते. हे जनरेटर सुमारे वर्षभरापासून रस्त्यावरच ठेवले जात आहे. शिवाय ग्राहकांची वाहनेही त्याच ठिकाणी उभी केली जातात. यामुळे वाहतूककोंडी होत असून अपघाताच्याही घटना घडत आहेत. मात्र वाहतूक पोलिसांसह पालिका अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब सुटत असल्यामागे अर्थपूर्ण कारण असल्याचा सर्वसामान्यांचा समज झाला आहे. मात्र शनिवारी आयुक्तांच्या आगमनापूर्वी हा जनरेटर सोसायटी आवारात लपवण्यात आला होता, तर आयुक्त गेल्यानंतर काही वेळातच तो पुन्हा रस्त्यावर मांडण्यात आला.
पार्किंग नसणाऱ्या सोसायट्यांवर कारवाई
By admin | Published: October 17, 2016 2:32 AM