इंदापूर : तहसीलदार वर्षा लांडगे व त्यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने आज (दि. २८) उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील कांदलगावच्या हद्दीतील नदीच्या पट्ट्यात अचानक छापा मारून, दोन ट्रकांसह वाळूउपशाच्या यांत्रिक बोटी व क्रेन असे सुमारे ७० लाख रुपयांचे साहित्य जप्त केले. सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश दत्तात्रय बाबर, प्रवीण गणपत बाबर (दोघे रा. कांदलगाव, ता. इंदापूर), सचिन नारायण डोंगरे (रा. लोणी देवकर, ता. इंदापूर), दिनेशकुमार (रा. लक्ष्मीपूर, ता. नैताल, जि. प. चंपारण, बिहार), मलखान सिंग (रा. चित्रकूट, उत्तर प्रदेश), रतन लहू वाघमारे (हडपसर, माळवाडी, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. व्याहळी गावचे तलाठी निलांजन जयवंतराव वानखेडे (रा. सरस्वतीनगर, इंदापूर) यांनी त्यांच्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याच्या अनुषंगाने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तहसीलदार वर्षा लांडगे, मंडलाधिकारी संतोष अनगरे, निलांजन वानखेडे, पोलीस कर्मचारी विकास राखुंडे, सुशांत तारळेकर यांनी आज सकाळी साडेआठ वाजता अचानक कांदलगावच्या नदीपट्ट्यात वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई सुरू केली. त्या वेळी उपरोक्त आरोपी ट्रक (एमएच १२ एलटी ०२९९) ट्रक (एमएच १२/ जीझेड ७१७१) यामध्ये ठेवण्यात आलेल्या यांत्रिक बोटी व दोन क्रेन (एमएच ४२ ई ९४३५), (एमएच ४२/ए ९१४८) सह वाळूउपसा करण्याच्या उद्देशाने आल्याचे त्यांना आढळून आले. महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकाची चाहूल लागताच साहित्य तेथेच ठेवून त्यांनी पोबारा केला. गणेश बाबर व प्रवीण बाबर अशी वाळूउपसा करणाऱ्या बोटींच्या मालकांची नावे आहेत. सचिन डोंगरे याचे क्रेन आहेत. दिनेशकुमार, मलखान सिंग व रतन वाघमारे हे क्रेनचालक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
उजनीतील वाळूउपशावर कारवाई सुरूच
By admin | Published: June 29, 2016 1:06 AM