पंकज रोडेकर, ठाणेधावत्या रिक्षातून उडी मारून जखमी झालेल्या स्वप्नाली प्रकरणी एकीकडे रिक्षा युनियनने त्या रिक्षाचालकाचे परमिट रद्द करा, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे आरटीओने अनधिकृत रिक्षांवर कारवाईचा बडगा उगरला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनधिकृत रिक्षांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील ८८ हजार ३५पैकी ठाणे शहरात सुमारे २९ हजार अधिकृत रिक्षा आहेत. मात्र, जिल्ह्यात १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षे रिक्षा धावत असल्याचे कारवाईत समोर आले आहे. अशा १३ रिक्षांवर जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई रक्षाबंधनाच्या दिवशीही शहरात सुरू ठेवण्यात आली होती. स्वप्नाली लाड प्रकरणी सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटले आहेत. राजकीय पक्षांनी त्या रिक्षाचालकाच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकला आहे. मात्र, स्वप्नाली अद्यापही बेशुद्ध असल्याने काही उलगडा होत नसल्याने त्या रिक्षाचालकापर्यंत पोहोचता येत नाही. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याबाबत ठोस माहिती उपलब्ध झालेली नसल्यामुळे तर्कवितर्कांवरच त्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. स्वप्नाली प्रकरणीचे गांभीर्य लक्षात घेत, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी मधुकर जाधव यांनी अनधिकृत रिक्षावरील कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी तीन पथके स्थापन करीत या मोहिमेत सर्व कागदपत्रे तपासली जात आहेत. ही कारवाई सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे १५० रिक्षांची तपासणी केली आहे. पहिल्याच दिवशी १७ तर दुसऱ्या दिवशी १२० रिक्षांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ६३ जणांना नोटीस बजावण्यात आली असून, १३ रिक्षांवर जप्तीची कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे रविवार आणि रक्षाबंधन असतानाही कारवाई सुरू ठेवून ३० वाहनांची तपासणी केली. ही मोहीम अशी सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी दिली.
ठाण्यात १३ रिक्षांवर जप्तीची कारवाई
By admin | Published: August 11, 2014 3:22 AM