ठाणे : उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर सार्वजनिक रीतसर परवानगी घेऊन उत्सव साजरा करतील, ही अपेक्षा गणेशोत्सव मंडळांनी फोल ठरवली आहे. ठाण्यात ३६० मंडळांपैकी केवळ २१४ मंडळांनी पालिकेची रीतसर परवानगी घेऊन मंडप टाकले आहेत. परंतु यातील ४० पेक्षा अधिक मंडळांनी नियमांचे उल्लंघन केले असल्याची माहितीही समोर आली आहे. तर महापालिका हद्दीतील ६६ मंडळांनी पालिकेची परवानगी न घेता मंडप उभारल्याचा अहवाल ठाणे तहसीलदारांनी महापालिकेला सादर केला आहे. त्यानुसार आता महापालिकेने या ६६ मंडळांना नोटिसा बजावल्या आहेत. परवानगी न घेता मंडप उभारल्याबद्दल या मंडळांना नोटिसा बजावून न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या नव्या धोरणाला बाजूला सारून वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा प्रकारे मंडप उभारले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या प्रस्तावाचा दाखला दिला आहे. त्यानुसार बहुसंख्य मंडळांनी आपल्या स्तरावर परंपरागत पद्धतीनेच मंडप उभारले आहेत. यापूर्वी महापालिकेने केलेल्या ठरावानुसार वाहतुकीला अडथळा ठरणार नाही, अशाप्रकारे मंडप उभारणीला परवानगी दिली आहे. त्याच आधारे सर्व मंडळांनी आपले मंडप यंदाही उभारले आहेत. मात्र त्याचवेळी न्यायालयाचा दट्ट्या बसण्याची भीती असल्याने सर्वच शासकीय यंत्रणा किमान कागदावरील कारवाईत मात्र आघाडीवर आहेत. ठाण्यातील रस्ते अडविणाऱ्या मंडपांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे तहसीलदारांना दिले होते. तसेच असे तो न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तंबी दिली होती. त्यानंतर ठाणे तहसीलदारांनी तयार केलेल्या अहवालात ६६ मंडळांनी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यापूर्वी मंडपाच्या विषयावरून नवी मुंबईतील एका मंडळाला एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला. त्याच धर्तीवर ठाण्यात कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
गणेशोत्सव मंडळांवर कारवाईची टांगती तलवार
By admin | Published: September 23, 2015 1:40 AM